scorecardresearch

नव्या वर्षात किरीट सोमय्या कोणते घोटाळे बाहेर काढणार? सूचक ट्वीटमुळे चर्चेला उधाण!

राष्ट्रवादीने भाजपाला बुलेट ट्रेन, ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था या आश्वासनांची आठवण करू दिली आहे.

नव्या वर्षात किरीट सोमय्या कोणते घोटाळे बाहेर काढणार? सूचक ट्वीटमुळे चर्चेला उधाण!
किरीट सोमय्या, उद्धव ठाकरे, शरद पवार (संग्रहित फोटो)

सर्वांनाच नव्या वर्षाचे वेध लागले आहे. अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या नव्या वर्षात राज्याचे राजकारण कोणती दिशा घेईल, याचा अनेकजण वेगवेगळे अंदाज लावत आहेत. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आश्वासनांचा संदर्भ देत भाजपावर टीका केली आहे. बुलेट ट्रेन, ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था या आश्वासनांचीही राष्ट्रवादीने आठवण करू दिली आहे. असे असतानाच आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी एक सूचक ट्वीट केले आहे. त्यांनी ठाकरे गट, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची नावे घेतली असून आगामी काळात त्यांच्या घोटाळ्यांचा हिशोब पुर्ण करणार, असे सांगितले आहे.

हेही वाचा >>> भाजपाच्या माजी आमदाराच्या बंगल्यामागे आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह! साताऱ्यात खळबळ

“उद्यापासून सुरु होणाऱ्या नव्या वर्षात ठाकरे परिवाराचे १९ बंगले, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे साई रिसॉर्ट, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, असलम खान यांचे ४९ स्टुडिओ, किशोरी पेडणेकर यांचे एसआरए फ्लॅट्स, मुंबई महापालिकेतील घोटाळा, या सर्वांचा हिशोब पूर्ण करणार,” असे सूचक ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

हेही वाचा >>> दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचा खोडसाळपणा, ८ वर्षीय मुलाच्या गुप्तांगाला बांधला नायलॉनचा धागा; दाखल करावं लागलं रुग्णालयात

राष्ट्रवादीने भाजपाला आश्वासनांची करून दिली आठवण

दुसरीकडे राष्ट्रवादीनेही भाजपाला लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादीने भाजपा तसेच मोदी सरकारवर ट्वीटच्या माध्यमातून टीका केली आहे. या ट्वीटमध्ये भाजपाने दिलेली आश्वासने तसेच आश्वासनांच्या पूर्ततेवर भाष्य करण्यात आले आहे. ‘२०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयाकडे घर असेल. २०२२ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. २०२२ पर्यंत भारतातील प्रत्येक घरात २४ तास वीज असेल. २०२२ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार, अशी अनेक आश्वासनं मोदी सरकारने दिली होती. आता २०२३ हे नवे वर्ष सुरू होण्यास १५ तास शिल्लक आहेत,’ असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 16:17 IST

संबंधित बातम्या