Kirit Somaiya sends notice to MIM Leader Imtiaz Jaleel: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातील ‘एमआयएम’ पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांना ‘तोतला’ म्हटल्याचा आरोप करत १० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची नोटीस पाठवली आहे. ही माहिती जलील यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून दिली आहे. या पोस्टनुसार, दोन राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये माफी मागावी आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचल्याबद्दल १० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी सोमय्या यांच्याकडून करण्यात आली आहे. याबद्दलची नोटीस जलील यांना सोमय्या यांच्या वकिलाकडून पाठवण्यात आली आहे. पण यावर सोमय्या यांनी या नोटीसबाबत दुजोरा दिला नाही.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माझ्यावर आरोप केला आहे की मी त्यांना ‘तोतला, तोतले, तोतल्या असे म्हटले आहे. तसेच त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे की मी त्यांचा कथित व्हिडिओ मुंब्राच्या मुख्य चौकात प्रक्षेपण करण्याची धमकी दिली होती, असे जलील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
“मुस्लिमांना लक्ष्य केलं जातंय”
“किरीट सोमय्या, तुम्ही भारतीय मुस्लिमांना परके आणि घुसखोर म्हणण्याचे निर्लज्ज धाडस करता, जरी आम्हीही तुमच्यासारखेच, किंबहुना तितकेच देशभक्त भारतीय आहोत. तुमच्यासारख्या लोकांच्या विचारांमुळे मदरसे बंद करण्याची मागणी केली जाते, कारण तुम्हाला वाटते की ते तरुणांच्या मनात दहशतवाद पेरतात. ज्या ठिकाणी भारतीय लोकसंख्येत मुस्लिम बहुसंख्य आहेत, त्या ठिकाणांना दहशतवाद्यांचे केंद्र असे संबोधले जाते. तुम्ही स्वतःच्या कबुलीनुसार मुंब्रा, मालेगाव, मानखुर्द यांसारख्या ठिकाणांना लक्ष्य करता, कारण तेथे मुस्लिम बहुसंख्य आहेत.”, असं जलील म्हणाले.
जलील यांचे प्रश्न
“लोकांच्या सोयीसाठी मी २२ जानेवारी २०२६ रोजीची त्यांची एक मुलाखत जोडत आहे, जी त्यांच्या मनातील विचार ते जवळजवळ दररोज कसे व्यक्त करतात, हे स्पष्ट करते. मुस्लिमांविषयी त्यांची भाषा, त्यांचा सूर आणि भावना हे आक्षेपार्ह नाहीत का? काहीच नसताना प्रकरण तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. रंग हिरवा असो किंवा केशरी यासाठी पोलिसांनी नोटीस बजावणे हा गुन्हा ठरतो का? लोकांनी विचारले पाहिजे, गुन्हा म्हणजे नेमके काय? एखाद्या समुदायावर वारंवार छळ करणे की अशा छळाविरुद्ध आवाज उठवताना त्या छळात सहभागी असलेल्या व्यक्तीला “तोतला” म्हणणे निर्णय तुम्हीच घ्या”, असं जलील म्हणाले.
अल्लाहने सत्य बोलण्याची आणि योग्य कृती करण्याची मोठी ताकद दिली आहे. मला भारताच्या संविधानावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे,सोमय्या. चला, न्यायालयात भेटूया, असं जलील सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
