एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकारचा ९ ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळ विस्तार झाला. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गटाचे ९ तसेच भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष तथा विकासक मंगलप्रभात लोढा यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रीपद मिळताच लोढा यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (१० ऑगस्ट) सदिच्छा भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा>>> “हे धोका देणाऱ्यांचं राज्य” बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपाची प्रतिक्रया, शेलार म्हणाले “लोकशाहीत बोलण्याचा अधिकार पण…”

नवनियुक्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज (१० ऑगस्ट) राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मनसेने भाजपा-शिंदे सरकारला पाठिंबा दिलेला आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारच्या बाजूने मत दिले होते. त्यानंतर भाजपाच्या कोट्यातील एक मंत्रिपद मनसेला दिले जाणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती, असे असताना मंगल प्रभात लोढा यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. या भेटीचे कारण आणि भेटीमधील चर्चेचा विषय समजू शकलेला नाही.

हेही वाचा>>> बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार! नितीशकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

सध्या शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार झालेला आहे. पहिल्या टप्प्यातील मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारही लवकरच होईल, असे म्हटले जात आहे. दुसऱ्या टप्प्प्यात अपक्ष तसेच नाराज नेत्यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. या टप्प्यात महिला नेत्यांनादेखील मंत्रिपद दिले जाऊ शकते. दरम्यान, सरकारला पाठिंबा देणाऱ्या मनसे पक्षाला सत्तेत वाटा मिळणार का हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असताना मंगलप्रभात लोढा यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader mangal prabhat lodha meets mns chief raj thackeray prd
First published on: 10-08-2022 at 16:38 IST