भाजपा आमदार अनिल सोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागपूर पोलीस आयुक्तांकडे केली आहे. फडणवीस यांना ट्रोल करण्यामागे टोळी असल्याचा अंदाज आहे असं सोले यांनी आपल्या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. यावरच प्रतिक्रिया देताना भाजपाचे नेते निलेश राणे यांनी फडणवीस यांना ‘ट्रोलर्सच्या धमक्यांना भीक घालू नका,’ असं सांगत त्यांना धीर दिला आहे. सोले यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या बातमीवर ट्विटवरुन राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नागपुरातील भाजपा नेत्यांनी मंगळवारी नागपुरच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली.  “पोलीस आयुक्तांकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यात येत असल्याचा मुद्दाही आम्ही उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात आपण सर्वजण एकत्रितपणे करोनाची लढाई लढत आहोत. पण जेव्हा कधी देवेंद्र फडणवीस काही भूमिका मांडतात तेव्हा त्यांना ट्रोल केलं जातं. यामागे एखादी टोळी असावी असा आमचा अंदाज आहे,” असं मत या भेटीनंतर बोलताना सोले यांनी व्यक्त केलं. “देवेंद्र फडणवीस अनेकदा आपली भूमिका मांडतात. मुख्यमंत्र्यांनाही पत्राच्या माध्यामातून आपली बाजू सांगत असतात. शासनाच्या मदतीने विषय मांडतात असतात. मात्र दरवेळी त्यांना ट्रोल केलं जातं. इतकंच नाही तर राज्यपालांच्या भेटीला गेले तरी ट्रोल केलं जातं. राज्यपालांना भेटण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांना ट्रोल करण्यासाठी एखादी खासगी कंपनी नेमली आहे की काय अशी शंका येते,” असंही सोले यांनी म्हटलं. अशापद्धतीने ट्रोलींग करणं चुकीचं असून हे बंद झालं पाहिजे असंही सोले म्हणाले.

याच भेटीसंदर्भातील वृत्तावर प्रतिक्रिया देताना निलेश राणेंनी फडणवीसांना ट्रोल करणारे ट्रोलर्स हे बोटं दाबून भाई झालेले आहेत, असा टोला लगावला आहे. “यांच्या (ट्रोलर्सच्या) धमक्यांना भीक घालू नका. शेंबडे आहेत सगळे. बोटं दाबून भाई झाले पण समोर कोण येत नाही. यांची लायकी मला चांगली माहीत आहे. शत्रू जसा आहे तसंच त्याला उत्तर गेलं पाहिजे” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.


नागपूरआधी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील भाजपा नेत्यांनाही मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेऊन फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांचा समावेश असणाऱ्या भाजापच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेत यासंदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.