भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. कारखान्याची सुमारे १९ कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. आर्थिक अडचणीत असलेल्या इतर काही कारखान्यांना सरकारकडून मदत मिळाली पण माझ्या कारखान्याला सरकारकडून मदत मिळाली नाही, अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती.
यानंतर आता पंकजा मुंडे यांनी कारखान्याच्या आर्थिक समस्येवर भाष्य केलं आहे. मी आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावातून जात आहे. माझं नऊ किलो वजन कमी झालं आहे. मी दररोज बँकांच्या पाया पडतेय, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी व्यथा मांडली आहे. त्या ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.
हेही वाचा- एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…
जीएसटी विभागाकडून झालेल्या कारवाईवर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “माझी आता परिस्थिती अशी आहे की, माझ्याबाबत सारख्या बातम्या येत आहेत. त्यावर मी काहीच बोलले नाही तर कसं होईल? दरवेळी मी अत्यंत सभ्य, समजदार आणि प्रगल्भ असल्याची भूमिका घ्यायची. पण काही तथ्यही असतात, ती सांगणं गरजेचं आहे. काही महिन्यांपूर्वी जीएसटी विभागाने कारखान्यावर छापा टाकला. त्यावेळी मी स्वत: माझी माणसं पाठवून कार्यालय उघडलं आणि संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रे दिली. त्यांना ज्या आकड्यांबाबत शंका होती, त्यामध्ये काहीही तफावत आढळली नाही.”
हेही वाचा- पंकजा मुंडेंवरील कारवाईवरून सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; म्हणाल्या, “निष्ठावंतांवर किती अन्याय…”
“हे खरं आहे की, आम्हाला आधी शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागले. आमचा कारखाना खूप अडचणीत आहे. मी आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावातून जात आहे. माझं नऊ किलो वजन कमी झालंय. मी दररोज बँकांच्या पाया पडतेय. हे सगळं होत असताना आजारी उद्योगांना मदत करायचं, हे सरकारचं धोरण नव्हतं, पण काही विशिष्ट कारखान्यांना मदत केली. माझ्याही कारखान्याकडून मदतीसाठी अर्ज केला होता. पण आम्हाला मदत मिळाली नाही,” असंही पंकजा मुंडे यांनी नमूद केलं.
हेही वाचा- “…म्हणून पंकजा मुंडेंवर कारवाई झाली असावी”, बच्चू कडूंचं थेट विधान
“माझ्या कारखान्यावर छापा पडला तेव्हाही मी आश्चर्य व्यक्त केलं होतं. खरं तर, सगळ्याच कारखान्यांना मदत झाली आणि माझ्या कारखान्याला मदत मिळाली नाही, यामुळे मी तक्रार करत नाही. पण कदाचित मदत मिळाली असती तर मी या पैशांची परतफेड करू शकली असते,” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.