महाराष्ट्रात सत्ताबदल जून महिन्यात झाला मात्र राजकीय भूकंपांची चर्चा आजही होते आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी फुटणार आणि अजित पवार ४० आमदारांसह भाजपात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं म्हटलं आहे. अशात पंकजा मुंडे यांनी राजकीय भूकंपांविषयी चिंता व्यक्त केली आहे. इतके राजकीय भूकंप झाले तर मला महाराष्ट्राची काळजी वाटते आहे असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे जे चर्चेत आहे.

काय म्हटलं आहे पंकजा मुंडेंनी?

“मला इतके राजकीय भूकंप झाले तर मला टेन्शन येतं. माझा महाराष्ट्र कसा राहिल? याचं मला टेन्शन येतं. महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल याचंही टेन्शन येतं. मला या सगळ्याचे काही संकेत असण्याचा काही भाग नाही. कारण राज्यातले नेते याबाबत निर्णय घेतील. भाजपाला अतिरिक्त नेत्यांची गरज आहे का? लोकांची गरज आहे का? या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मी नाही” असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाल्या आहेत पंकजा मुंडे?

“माझ्या पंधरा वर्षांच्या राजकारणात मी कधीही कुणावर व्यक्तिगत पातळीवर टीका केलेली नाही. भूकंप विरहित पक्ष बांधणीची गरज आहे. मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे हे आमच्या हातात नाही. २०२४ च्या निवडणुकीत ते जनता ठरवणार आहे. लोकांचा विश्वास जिंकून भाजपाने निवडणुका जिंकल्या आहेत. यापुढेही तसंच होईल. ” असाही विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केला.

परळी कृषी उत्पन्न बाजार समितीत माझी लढाई आहे. दोघेही मल्ल मोठ्या शक्तीचे आहेत. मात्र प्रवृत्ती वेगळी आहे”, अशा शब्दांत पंकजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात सातत्याने वाद रंगलेला बघायला मिळतो आहे. काही दिवसांपूर्वी मात्र या दोघांनी एकमेकांचं कौतुक केलं होतं.