भारतीय जनता पार्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून निर्मला सितारामन यांनी अलीकडेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते राम कदम यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपाने काँग्रेसचा बालेकिल्ला असणारी अमेठी जिंकली, तर मग बारामती का जिंकणार नाही, असं विधान राम कदम यांनी केलं आहे. ते अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत.
केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन बारामती दौऱ्यावर आल्या असता त्यांच्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मतदारसंघात फिरायला सुरुवात केली आहे. मागील अडीच वर्षात त्या आपल्या मतदारसंघात फिरकल्या नव्हत्या, अशी टीकाही राम कदम यांनी केली आहे.
हेही वाचा- Andheri Bypoll: “हे खूप चुकीचं झालंय”, निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांचा आक्रोश
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राम कदम म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्याला मिळालेला प्रतिसाद आणि जनतेत सुरू झालेली सकारात्मक चर्चा लक्षात घेऊन सुप्रिया सुळेंनी आपल्या मतदारसंघात जायला सुरुवात केली. सुप्रिया सुळे मागील अडीच वर्षापासून आपल्या मतदारसंघात फिरकल्या नव्हत्या. शेवटी १८ महिन्यानंतर याचा निकाल लागेलच.
पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, अमेठीत भारतीय जनता पार्टी जिंकू शकते, तर बारामतीत का जिंकणार नाही? येथेही आम्ही जिंकू. याचा प्रत्यय आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळेल, असंही राम कदम म्हणाले.