scorecardresearch

“राज्यात शरद पवारांनीच पहिल्यांदा शिवसेना फोडली, संजय राऊत…”, भाजपा नेते राम शिंदेंचा गंभीर आरोप

भाजपाचे नेते राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “या राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलं,” असा आरोप राम शिदेंनी केला.

Ram Shinde Sharad Pawar Shivsena
राम शिंदे व शरद पवार (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भाजपाचे नेते राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “या राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलं,” असा आरोप राम शिदेंनी केला. तसेच सकाळ-दुपार-संध्याकाळ फडफड बोलणाऱ्या संजय राऊतांनी यावरही बोलावं, असं म्हणत हल्ला चढवला.

राम शिंदे म्हणाले, “संजय राऊत सकाळ-दुपार-संध्याकाळ फडफड बोलतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला पहिल्यांदा कोणी फोडण्याचा प्रयत्न केला आणि कोणी शिवसेना फोडली यावरही बोलावं. या राज्यात शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलं. आजतागायत छगन भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे आहेत आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यामुळे यावरही संजय राऊतांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे.”

“राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा”

“संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा आहेत. त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. ते जे बोलत आहेत त्याला कुठलाही आधार नाही. अमित शाह हे राष्ट्रीय नेते आहेत, ते गृहमंत्री आहेत. त्यामुळे ते राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्याबद्दल अशापद्धतीचं वक्तव्य करणं संजय राऊतांचं काम राहिलेलं नाही,” असं म्हणत राम शिदेंनी राऊतांना टोला लगावला.

हेही वाचा : “शिवसेना आणि धनुष्यबाण मिळवण्यासाठी आत्तापर्यंत २ हजार कोटींचा सौदा…” संजय राऊत यांचा गंभीर आरोप

“राऊतांनी सकाळ-दुपार-संध्याकाळ बोलून शिवसेनेचा कार्यक्रम केला”

“संजय राऊतांनी सकाळ-दुपार-संध्याकाळ असं दिवसातून तीनवेळा बोलून शिवसेनेचा कार्यक्रम केला आहे. ते शिवसेनेत राहून राष्ट्रवादी काँग्रेसचं व शरद पवारांचं काम करत आहेत. त्यामुळे शिवसेनेची दुर्दशा झाली आहे. यातून त्यांच्या बौद्धिक क्षमतेची लक्तरे उडाले आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राची जनता पाहत आहे. त्यामुळे राऊत काय म्हणतात हे भाजपाने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही,” असंही शिंदेंनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 12:10 IST
ताज्या बातम्या