scorecardresearch

शिंदे-फडणवीस सरकार पडणार का? मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या भवितव्यावर भाष्य केलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकार पडणार का? मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं किंवा हे सरकार अल्पकाळ टिकेल, अशी भाकितं काही राजकीय नेत्यांकडून वर्तवण्यात आली आहेत. या चर्चांना भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे सरकार आपला उर्वरित कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिंदे-फडणवीस सरकार पडू शकत? या विरोधकांच्या दाव्याबाबत विचारलं असता रावसाहेब दानवे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची कुठल्याही प्रकारची भीती नाही. विरोधकांनी आधी त्यांच्या मनातील भीती काढून टाकावी. हे सरकार आपला उर्वरित कार्यकाळ पूर्ण करेल आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला आम्ही एकत्र सामोरं जाऊ. एवढेच नव्हे तर २०२४ ला आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.

हेही वाचा- खरी शिवसेना कुणाची? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं; शरद पवारांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला

“स्थानिक पातळी शिवसेनेशी युती करून निवडणुका लढण्याचा प्रयत्न करू” या शरद पवारांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता, रावसाहेब दानवे म्हणाले की, “हे बघा, निवडणुकीला अजून दोन ते तीन वर्षे बाकी आहेत. राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडल्या? हे आपल्याला माहीतच आहे. पुढील अडीच वर्षात आणखी काय होईल? हे आताच सांगता येत नाही. मात्र, एक सांगू शकतो की शिंदेसाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही अभेद्य युती आहे. एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना आहे. राज्यातील जनतेनं याच शिवसेनेला मतं दिली आहेत. त्यामुळे आम्ही खऱ्या शिवसेनेबरोबर गेलो आहोत. तसेच हे सरकार आपला कार्यकाळही पूर्ण करेल.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader raosaheb danve statement on shinde fadnavis government after meeting with cm eknath shinde mumbai rmm

ताज्या बातम्या