Sudhir Mungantiwar On Sharad Pawar : पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यी दोन दिवसांपासून रस्त्यावर उतरले आहेत. आयबीपीएसची परीक्षा व एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियमित राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं. यानंतर राज्य सरकारने २५ ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश त्यामध्ये करण्याच्या मागणीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे. या पार्श्वभूमीवरच शरद पवारांनी या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारने या विद्यार्थ्यांची मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनात उतरणार असल्याचा इशारा शरद पवारांनी दिला. यानंतर आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. “महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर नव्हते का?”, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“बदलापूर सारख्या कोणत्याही घटनांचं कोणीही राजकारण करू नये. बदलापूरची अतिशय वेदना देणारी घटना आहे. बदलापूरच्या घटनेतील आरोपीला कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळे विशेष करुन अशा घटनेचे कोणीही राजकारण करू नये. अशा घटना करणाऱ्याला कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंगणघाटमध्ये एका महिलेला जिवंत जाळून टाकण्याची घटना घडली होती. मात्र, तेव्हा त्याचे राजकारण कोणीही केले नाही. अशा घटनेचे राजकारण करून त्या घटनेतील गांभीर्यता कमी होते”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा : Sharad Pawar on Pune Protest: शरद पवारांचा सरकारला अल्टिमेटम; म्हणाले, “उद्यापर्यंत भूमिका घेतली नाही तर मी स्वत: आंदोलनात उतरेन”!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून ‘मविआ’वर टीका

शरद पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला. यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार असतानाही विद्यार्थ्यांची आंदोलने झाली. मग तेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर नव्हते का? मग तेव्हा शरद पवार मैदानात उतरले नाहीत. मात्र, आता निवडणुका आहेत तर लगेच मैदानात उतरणार म्हणतात”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

…म्हणून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं उपरणं घातलं

“उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या मेळाव्यात काँग्रेसचं उपरणं घातलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणजे जागांसाठी ते लढत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं नाही तरी चालेल. आता अजून दोन दिवसांनी ते सांगतील की, मला जागा दिल्या नाही तरी चालेल. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी काँग्रेसचं उपरणं घातलं. आता विधानसभेच्या जागा देखील काँग्रेसला देतील. ते ३ दिवस दिल्लीत जाऊन राहिले आणि पुन्हा परत येताना काँग्रेसच्या नेत्यांनी फक्त चहा आणि पोहे खाऊन त्यांना पाठवलं”, अशी खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर केली.