राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुण्यातील सभेत बोलत असताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. “शाहिस्ते खान, औरंगजेब आणि मुघल शासक होते, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते”, असे सांगत असताना जितेंद्र आव्हाड यांनी माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावेड यांच्या एका जुन्या वक्तव्याचा दाखला दिला. “विनोद तावडे यांनी अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास काढून टाकणार असल्याचे सांगितले होते.” या विधानाचा हवाला देत जितेंद्र आव्हाड यांनी सदर वक्तव्य केले. त्यानंतर आता भाजपाचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले आहे. तीन ट्विट करत तावडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मला जितेंद्र आव्हाड यांचे लॉजिक समजत नाही, असा टोलाही विनोद तावडे यांनी लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वाचा >> जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यांवरुन भाजपा – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने; आव्हाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

काय म्हणाले विनोद तावडे?

“मी शिक्षण मंत्री असताना मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार, असं जितेंद्र आव्हाड एका भाषणात म्हणाले. मी सांगू इच्छितो की, मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ छत्रपतींचा शौर्याचा इतिहास काढणार असे होत नाही. मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ, आदीलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांची भलामन करणारा इतिहास बाजूला काढणार. मोगलांनी कलेला आश्रय दिला, त्यांचे स्थापत्यशास्त्र चांगलं होतं, हा इतिहास काढणार. ‘अकबर द ग्रेट’ ज्याने लाखो हिंदूची कत्तल केली, याची शिकवण बाजूला काढणार. मला जितेंद्र आव्हाड यांचे लॉजिक समजत नाही. शाहिस्ते खान, औरंगजेब शिकवला म्हणजे महाराजांचे शौर्य कळते का? त्यांना असं म्हणायचं आहे का, कसाब आला म्हणून शहीद तुकारम ओंबळे, करकरे यांचे शौर्य दिसले. ते शूर होतेच, त्यासाठी कसाबने येण्याची गरज नव्हती.”, अशी टीका विनोद तावडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

“मला एक दिवस विनोद तावडे विधानसभेत म्हणाले, आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातून काढणार. मग शिवाजी महाराज गोट्या खेळताना दाखविणार का? समोर औरंगजेब आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. त्यातून शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवितात हे जगासमोर येते. १६६९ मध्ये जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा खजिन्याचे टाळे उघडा, हे सांगणारे शिवाजी महाराज जगातले पहिले राजे होते.”, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी पुणे येथील सभेत केले होते.

हे वाचा >> “मी नखाला नख घासलं, पण माझे केस…”, अजित पवारांनी रामदेव बाबांचा किस्सा सांगताच सभेत हशा पिकला

मोगलांचा इतिहास शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतून बाहेर काढल्यानंतर शिवाजी महाराजांचे चातुर्य, शौर्य, गनिमी कावा, ज्याची दखल जगाने घेतली. ते यापुढे कसं दाखविणार? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी वरील वक्तव्यावर आपली बाजू मांडतांना उपस्थित केला. जेव्हा शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला गेला, तेव्हा समोर शाहिस्ते खान, औरंगजेब, अफजलखान ठेवावाच लागेल. पण यांचा प्रयत्न आहे की, तिघांनाही काढून टाका. कालांतराने म्हणतील शिवाजी महाराज देखील नव्हतेच, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader vinod tawde slams ncp jitendra awhad over chhatrapati shivaji maharaj statement kvg
First published on: 06-02-2023 at 16:26 IST