scorecardresearch

शिंदेंच्या ठाण्यावर भाजपाचा डोळा 

डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचा खासदार निवडून यावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पद्धतशीरपणे मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपा नेत्यांनी कल्याण पाठोपाठ आता ठाण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.

BJP focused eknath shinde Thane
शिंदेंच्या ठाण्यावर भाजपाचा डोळा (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपाचा खासदार निवडून यावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पद्धतशीरपणे मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपा नेत्यांनी कल्याण पाठोपाठ आता ठाण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे संयोजक डाॅ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईदर भागातील पक्षाचे आमदार, तसेच प्रमुख नेत्यांची एक बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी २५ प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक गाभा समिती स्थापन करण्यात आली.

लोकसभा मतदारसंघाच्या पुर्नरचनेनंतर २००९ पासून युतीच्या राजकारणात ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीचा एकमेव अपवाद वगळला तर जुन्या ठाणे जिल्ह्याचा भाग असलेला पालघर लोकसभा मतदारसंघही शिवसेनेकडे आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा नेहमीच बालेकिल्ला राहिला असला तरी गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र बदलू लागले आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक आठ मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा वरचष्मा असला तरी ग्रामीण भागात मात्र भाजपाकडे प्रभावी नेत्यांची मोठी फळी आहे. मागील विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची खेळी फसल्यामुळे शहापूर सारखा ग्रामीण भागातील बालेकिल्लाही शिवसेनेला गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर कल्याण आणि ठाणे या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकहाती प्रभाव असलेल्या दोन्ही मतदारसंघांत भाजपाने जोरदार तयारी सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा – Karnataka Election : बेळगावमधील सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस पक्षात चुरस; सीमावाद मोठा प्रश्न

ठाण्यावर भाजपाचा वरचष्मा?

ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी तीन ठिकाणी भाजपाचे तर दोन ठिकाणी एकनाथ शिंदे गटातील आमदार आहेत. मीरा-भाईदर विधानसभा मतदारसंघातून गेल्यावेळेस गीता जैन या अपक्ष म्हणून निवडून आल्या. पुढे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच जैन यांनी शिवसेनेला पाठींबा जाहीर केला. सहा महिन्यांपूर्वी राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर मात्र गीता जैन पुन्हा एकदा भाजपाच्या कळपात दिसू लागल्या आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी शनिवारी भाजपा नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत आमदार जैन या उपस्थित होत्या. विशेष म्हणजे मीरा-भाईदर मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर लढलेले तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता मात्र या बैठकीस उपस्थित नव्हते. ठाणे लोकसभा मतदारसंघातील भाजपाची वाढलेली ताकद लक्षात घेता हा मतदारसंघ भाजपानेच लढवावा, असा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला. या बैठकीस नवी मुंबईतील प्रभावी नेते गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार संजय केळकर, आमदार गीता जैन, आमदार निरंजन डावखरे हेदेखील उपस्थित होते.

हेही वाचा – Karnataka : जात, धर्म सोडून फक्त स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढविणार; पृथ्वी रेड्डी यांनी सांगितली ‘आप’ पक्षाची रणनीती

उमेदवारीसाठी चुरस

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार सध्या शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले आहे. यासंबंधीचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असले तरी कल्याण आणि ठाणे या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा अजूनही कायम आहे. ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे सध्या उद्धव ठाकरे गटात असल्याने भाजपा नेत्यांचा ठाण्यासाठी आग्रह वाढताना दिसत आहे. ठाण्याची जागा शिंदे यांच्या शिवसेनेसाठी सुटली तरी तेथून कोण उमेदवार असेल याविषयी स्पष्टता नाही. शिंदे यांच्या निकटच्या वर्तुळात खासदारकी लढविण्यासाठी इच्छुकांची नावेही फारशी चर्चेत नाहीत. या उलट भाजपामध्ये मात्र ठाण्यासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा आतापासूनच सुरू आहे. भाजपाचे ठाणे लोकसभेचे संयोजक डाॅ. विनय सहस्त्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक तसेच ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर अशी तिघांची नावे उमेदवार म्हणून गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत. ठाण्याचे आमदार केळकर आणखी एकदा विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असले तरी भाजपाची सध्याची कार्यपद्धती पहाता श्रेष्ठींच्या पुढे कुणाचे काही चालेल ही शक्यता कमीच आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी घेण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत संघटन सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून लोकसभेच्या तयारीसाठी २५ जणांची विशेष समिती तयार करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 18:07 IST

संबंधित बातम्या