वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या अनावरण सोहळ्याला गैरहजर राहणाऱ्या काँग्रेसवर राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी टीका केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री पार पडलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकाच्या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ते अर्थमंत्री असताना या विधेयकाची सुरुवात झाल्याची आठवण करुन दिली होती. त्यांच्या या विधानाला पकडून बाळाच्या नामकरणाला गैरहजर राहणे हास्यास्पद असल्याचा टोला तावडे यांनी काँग्रेसला लगावला. वस्तू व सेवा कर लागू करण्यासाठी मध्यरात्री पार पडलेल्या सोहळ्यावर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पक्षाने बहिष्कार टाकला होता. हे विधेयक सर्वप्रथम काँग्रेसने मांडले होते. पण यावेळी भाजप सरकारने विधेयकाला विरोध दर्शवला होता. यावर तावडे म्हणाले की,  काँग्रेसने तयार केलेल्या विधेयकातील चुका दुरुस्त करुन जनतेच्या हितासाचे मुद्दे पंतप्रधानांनी नव्या विधेयकात मांडल्याचे त्यांनी सांगितले. ठाण्यातील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

याळी केंद्र सरकारने लागू केलेला वस्तू व सेवा कर म्हणजेच GST प्रणालीचा मराठी चित्रपट आणि नाटक सृष्टीला फायदा होईल, असे मत  तावडे यांनी व्यक्त केले.  वस्तू व सेवा कर लागू झाल्यामुळे मराठी सिनेमा आणि नाटक याना अच्छे दिन येतील, असे ते म्हणाले. कर रूपाने येणाऱ्या पैशातून नाट्यगृहाची अवस्था सुधारेल. त्यामुळे नाट्यसृष्टीतील मंडळींना ही प्रणाली वरदान ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात वस्तू आणि सेवा कर आज पासून लागू झाल्यामुळे मराठी सिनेमावर लावण्यात आलेली दराची अट भविष्यात शिथिल होणार आहे. परंतू आता सरसकट एकच कर भरावा लागणार आहे. या करामुळे व्यापारी वर्ग देखील समाधानी असून काही व्यापारी संभ्रमात आहेत. त्यांच्या मनात वस्तू व सेवा कर GST बद्दल भिती असून पुढील १५ दिवसात त्यांचा संभ्रम दूर होईल. असे ते म्हणाले.

वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश

राज्य सरकारच्यावतीने १ जुलै ते ७ जुलै या दरम्यान वृक्ष लागवडीची मोहिम राबवण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून  विनोद तावडे यांनी पुतण्याच्या लग्नाच्या पूर्वी वृक्षारोपण करून नागरिकांना वृक्षारोपण करण्याचा संदेश दिला. यावेळी त्यांचा पुतण्या सम्राट तावडे आणि त्याची होणारी पत्नी प्राजक्ता जोशी यांनी जोडीने वृक्षारोपण केले.