सांगली : सांगली जिल्हा नियोजन मंडळामध्ये महायुतीतील भाजपला झुकते माप मिळण्याची चिन्हे असून, यापाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सदस्य असतील, असे संकेत सोमवारी मिळाले. महायुतीतील घटक पक्षांनाही ताकदीप्रमाणे स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समजते.राज्यात रखडलेली नियोजन समितीचे सदस्य निश्चित करण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा काळ लोटला असून, नवीन यादीतील नावे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निश्चित केली असून, ही यादी अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आज मिळाली.
जिल्हा नियोजन मंडळाच्या यादीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे खा. धैर्यशील माने यांच्या एकमेव नावाचा समावेश आहे. तर भाजपमधील आ. गोपीचंद पडळकर, सम्राट महाडिक, दीपक शिंदे, संग्राम देशमुख हे चार सदस्य असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे निशिकांत भोसले-पाटील व प्रा. पद्माकर जगदाळे या दोघांचा समावेश आहे. तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि रयत क्रांती संघटनेचे अमोल पाटील यांचाही यादीत समावेश आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वाक्षरीने ही यादी अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती असून, यादीला शासनाची मंजुरी येत्या दोन दिवसांत मिळण्याची शक्यता असून, नवीन नियोजन मंडळाची बैठक दि. १४ अथवा १६ जून रोजी बोलावली जाणार असल्याचे सांगण्यात आले. शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतरच सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. सांगली नियोजन मंडळाची सदस्य संख्या ४० असून, यांपैकी ३२ सदस्य हे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांमधून निवडण्यात येतात. मात्र, या निवडणुकाच झाल्या नसल्याने निवडणूक होईपर्यंत या जागा रिक्त राहणार आहेत. आमदार, खासदार हे नियोजन मंडळाचे पदसिद्ध सदस्य असून, पालकमंत्री हे अध्यक्ष आहेत, तर जिल्हाधिकारी हे नियोजन मंडळाचे सदस्य सचिव आहेत.