लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला. त्या निकालाने महाराष्ट्रात भाजपासह महायुतीला आरसा दाखवला आहे. महाराष्ट्रात भाजपाला अवघ्या ९ तर महायुतीला १७ जागा मिळाल्या आहेत. आता या निकालाचा विचार करुन भाजपासह महायुतीचे नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेलं अपयश त्यांना धुवून काढायचं आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्यात. त्यांचा आत्मविश्वासही दुणावला आहे. राज्यात पुन्हा मविआ सरकार येईल आणि आम्ही १८५ जागा जिंकू असं महाविकास आघाडीचे नेत सांगत आहेत. या सगळ्यात अजित पवारांना भाजपाने बरोबर घेऊन चूक केली का? या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी उत्तर दिलंय.

ऑर्गनायझरमध्ये भाजपावर टीका

लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपावर संघाचं मुखपत्र मानलं जाणाऱ्या द ऑर्गनायझरमध्ये एक लेख लिहून टीका करण्यात आली आहे. संघाचे स्वयंसेवक रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे. महाराष्ट्रात अजित पवारांबरोबर केलेली हातमिळवणी आणि काँग्रेस नेत्यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपाला झटका बसल्याचं मत त्यांनी नोंदवलं आहे. तसंच भाजपा आणि शिंदेंची शिवसेना यांच्याकडे आवश्यक बहुमत होतं तरीही अजित पवारांशी हातमिळवणी का केली? असा सवालही रतन शारदा यांनी विचारला आहे. याबाबत छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी आश्चर्य वाटेल असंच उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- पुन्हा एकाच कुटुंबात पदांचं वाटप होतंय का? सुनेत्रा पवारांबाबत प्रश्न विचारताच छगन भुजबळ म्हणाले…

काय म्हणाले छगन भुजबळ?

अजित पवारांना बरोबर घेतल्याने भाजपाचं नुकसान झालं का? ऑर्गनायझरमध्ये लेख आहे, याबाबत काय सांगाल? हे विचारताच भुजबळ म्हणाले, ” होय, त्यांनीच नाही तर अनेकांनी टीका केली आहे. काँग्रेसच्या लोकांना बरोबर घेतल्याने नुकसान झाल्याचंही म्हटलं आहे. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. आम्हालाही बरोबर घेतलंय. ऑर्गनायझरची जी भूमिका आहे ती एकंदरीत योग्य आहे.” असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. त्यांच्या या उत्तराने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसंच त्यानंतर भुजबळ यांनी महत्त्वाचं वक्तवय् केलं आहे.

भारतातही सेटबॅक बसलाच आहे

महाराष्ट्राबाबत तुम्ही हे जे काही मला विचारत आहात ते ठीक आहे. पण मग भारतात इतर ठिकाणी काय चित्र आहे? इतर ठिकाणीही भाजपाला सेटबॅक बसलाच आहे. त्यामुळे नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडूंना बरोबर घेऊन आघाडी करावी लागली. असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.

८० ते ९० जागांची मागणी

महायुतीला विधानसभेचे वेध लागले आहेत. अशात तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन लवकरात लवकर जागावाटपाचा निर्णय घेतला पाहिजे असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. ८० ते ९० जागांवर आम्हाला हव्या आहेत असंही छगन भुजबळ यांनी पुन्हा स्पष्ट केलं. याआधीही शिवसेना आणि राष्ट्रवादीला समान जागा मिळाव्यात असं म्हटलं आहे.