महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. काँग्रेसपाठोपाठ आता भारतीय जनता पक्षानेही आपल्या तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुतीत निर्माण झालेली रस्सीखेच दूर करत भाजपाने पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघांवर आपले उमेदवार निश्चित केले आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत मोठा तिढा निर्माण झाला होता. मात्र, अखेर ही जागा भाजपाने आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे.
भाजपाचे तीन अधिकृत उमेदवार
- पुणे पदवीधर मतदारसंघ: डॉ. स्मिता योगेश जाधव
- नागपूर पदवीधर मतदारसंघ: सुधाकर कोहळे
- पुणे शिक्षक मतदारसंघ: कौस्तुभ गावडे
नागपुरात काँग्रेसच्या अभिजित वंजारींविरुद्ध सुधाकर कोहळे मैदानात
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे निष्ठावंत नेते सुधाकर कोहळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील ‘रामगिरी’ बंगल्यावर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर त्यांची उमेदवारी निश्चित झाली. या मतदारसंघात त्यांची थेट लढत काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांच्याशी होणार आहे.
कोण आहेत सुधाकर कोहळे?
राजकीय प्रवासासोबतच शैक्षणिक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव, नागपूर महानगरपालिकेत भाजपाच्या तिकिटावर दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले तसेच त्यांनी पाणीपुरवठा सभापती म्हणून कार्यभार सांभाळला आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण-पूर्व नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे दिग्गज नेते सतीश चतुर्वेदी यांचा पराभव करत त्यांनी विधानसभेत धडक मारली होती. २०१९ मध्ये उमेदवारी नाकारली गेल्यानंतरही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. २०२४ च्या निवडणुकीत पश्चिम नागपूरमधून त्यांना पराभव पत्करावा लागला; मात्र पक्षाने लगेचच त्यांच्यावर नागपूर पदवीधर मतदारसंघाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली.
पुणे पदवीधर: शिक्षणतज्ज्ञ डॉ. स्मिता जाधव भाजपाचा नवा चेहरा
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपाने डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या रूपाने नवा चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे.
डॉ. स्मिता जाधव यांचा परिचय:
त्यांनी पीएच.डी. (एज्युकेशन), एम.बी.ए. (फायनान्शियल मॅनेजमेंट) आणि बी.ई. (कॉम्प्युटर) असे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. पिंपरी-चिंचवड येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या त्या प्र-कुलगुरू असून ‘पुढारी पब्लिकेशन’च्या संचालक आणि ‘टोमॅटो ९४.३ एफएम’च्या कार्यकारी संचालक आहेत. ‘कस्तुरी क्लब’च्या माध्यमातून तब्बल १८ हजारांहुन अधिक महिलांचे नेटवर्क उभारून त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांना ‘वेणुताई चव्हाण युवती पुरस्कार’, ‘ग्लोबल वुमेन इन्स्पिरेशन अवॉर्ड’ आणि ‘एज्युप्रन्योर ऑफ द इयर’ यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघ: कौस्तुभ गावडे यांना संधी
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरू होती. अखेर ही जागा भाजपाकडे आली असून पक्षाने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे.
कोण आहेत कौस्तुभ गावडे?
एम.कॉम. (M.Com) आणि एम.बी.ए. (MBA) पदवीधारक. कोल्हापूर येथील प्रसिद्ध ‘श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थे’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून ते कार्यरत आहेत. शिक्षक, प्राध्यापक, संस्थाचालक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि त्यांच्यासोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांना आहे.
निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक
राज्य निवडणूक आयोगाने ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे:
| टप्पा | तारीख व वेळ |
|---|---|
| अधिसूचना जारी | २९ सप्टेंबर २०२६ |
| उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख | ६ ऑक्टोबर २०२६ |
| अर्जांची छाननी | ७ ऑक्टोबर २०२६ |
| अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत | ९ ऑक्टोबर २०२६ |
| मतदानाचा दिवस | २३ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४) |
| मतमोजणी व निकाल | २७ ऑक्टोबर २०२६ |
कोणत्या मतदारसंघातून कोणाची मुदत संपतेय?
- औरंगाबाद पदवीधर: सतीश भानुदास चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार)
- पुणे पदवीधर: अरुण गणपती लाड (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार)
- नागपूर पदवीधर: अभिजित गोविंदराव वंजारी (काँग्रेस)
- अमरावती शिक्षक: किरण रामराव सरनाईक (शिवसेना – शिंदे गट)
- पुणे शिक्षक: जयंत दिनकर आसगावकर (काँग्रेस)
