idhan Parishad Election and the brewing Mahayuti Dispute : स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पु्न्हा एकदा महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपाने महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आम्हाला हद्दपार केलंय, आमचा मोठा भाऊ आम्हाला संपवतोय, अशी खंत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझाशी बोलत होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार यांनी छत्रपती संभाजी नगरमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. कारण, या जागेवरून भाजपाने (महायुती) सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली.
कार्यकर्त्यांनी समीर सत्तार यांचा अर्ज भरला
महायुतीने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिलेली असताना समीर सत्तार यांनीही उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीतील वाद समोर आला. याबाबत अब्दुल सत्तार म्हणाले, “खरं म्हणजे आम्ही अर्ज भरला नाही. कार्यकर्त्यांनी अर्ज भरला आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात ५३ नगरसेवक आहेत. त्यामुळे मतदारांच्या भावना जपाव्या लागतात. सर्व गावाच्या लोकांनी आपआपल्या पद्धतीने माझ्या मुलाशी अप्रत्यक्ष संपर्क साधून त्यांनी अर्ज भरण्यास सांगितलं. त्यातून हा अर्ज भरलेला आहे. उद्या मला मुंबईला बोलावलं आहे. एकनाथ शिंदेंनी उद्या समन्वय बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते काय आदेश देतात त्यावर उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल. मी एकनाथ शिंदेशी चर्चा करेन.”
आता जिल्हा मध्यवर्ती बँक ताब्यात घेण्याचा प्रयत्न
दोन निवडणुका महत्त्वाच्या झाल्या. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या. या ठिकाणीतर आम्ही तात्पुरते हद्दपार झालो आहोत. लोकशाहीत त्यांनी कसा त्यांचा पक्ष वाढवावा हा त्यांचा प्रश्न आहे. तिसरी निवडणूक मध्यवर्ती बँकेची लागली आहे. त्या निवडणूक नियोजनात आमच्या (शिंदेसेना) लोकांना हाताशी धरून जिल्हा मध्यवर्ती बँकेही ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असाही दावा अब्दुल सत्तार यांनी केला.
मोठा भाऊच आम्हाला संपवतोय
शिवसेना पक्ष तोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. हात तोडायचे, पाय तोडायचे असं हळूहळू सुरू असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी आज केला होता. या दाव्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, “आमचं तर मुंडकंच तोंडून टाकलं. अनेक वर्षांची असलेली आमची जिल्हा परिषद गेली. महापालिकेतील सत्ता संपली. आता राहिलं काय? लहान मोठ्या जागांवर भाजपा जागा बळकावत आहे. शिवसेनेत दोन भाग करायचे, एकाला हाताशी धरायचं आणि दुसऱ्यावर अन्याय करायचा. दुसऱ्याला धरायचं अन् तिसऱ्यावर अन्याय करायचा. अशा पद्धतीने आमचा मोठा भाऊ आम्हाला संपवत असेल तर त्याला इलाज नाही. राज्याचे मुख्यमंत्री समजू शकतात, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. एकनाथ शिंदेंच्या समन्वयाने देवेंद्र फडणवीस जे निर्णय घेतील त्यांच्या आदेशाचं पालन करू. आम्ही काही ना काही त्याग केलेला आहे. आमच्या त्यागाशिवाय तुम्ही सत्तेवर आलेले नाहीत. एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांत जे क्रांतीकारक निर्णय घेतले आहेत, त्यामुळे ते (महायुती) सत्तेत आले आहेत. पण आता ते सर्व विसरून गेले आहेत. कामाख्या देवीलाच माहितेय आम्ही काय केलं आणि काय नाही.”
