रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनी यंदा राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. विशेषतः ग्रामीण भागात भाजपने केलेली घुसखोरी ही अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे. प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्हा परिषदेच्या दोन आणि पंचायत समितीच्या तीन जागांवर विजय मिळवत आपले पाय ग्रामीण भागात रोवले आहेत.
खेर्डी गटात भाजपच्या रावी मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) दिग्गज नेत्या दिशा दाभोळकर यांचा पराभव करत मोठा राजकीय उलटफेर घडवून आणला. याच खेर्डी गणात भाजपचे विनोद भुरण यांनी माजी सदस्य नितीन ठसाळे यांचा ५६९ मतांनी पराभव केला.
आमदार शेखर निकम यांची ‘एकला चलो रे’ किमया
नगर परिषद निवडणुकीत पिछाडीवर पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) आमदार शेखर निकम यांनी ग्रामीण भागात नवसंजीवनी दिली आहे. स्वबळावर लढताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या तीन आणि पंचायत समितीच्या तब्बल सात जागांवर विजय मिळवत ग्रामीण भागातील आपली पकड अजूनही मजबूत असल्याचे सिद्ध केले. सावर्डे गटात पूजा निकम यांनी ५,६१९ मतांच्या विक्रमी फरकाने मिळवलेला विजय हा या निवडणुकीतील चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
अलोरेमध्ये ‘झगडे’ पती-पत्नीची सरशी
अलोरे मतदारसंघात यंदा वेगळाच राजकीय योगायोग पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद झगडे हे पंचायत समिती गणातून विजयी झाले, तर त्यांच्या पत्नी विनया झगडे यांनी जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला. या पती-पत्नी जोडीने अलोरेमध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे.
अनेक माजी सदस्यांना मतदारांचा नकार
या निवडणुकीत अनेक माजी पदाधिकाऱ्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. कोकरे गटात माजी सभापती संतोष चव्हाण यांचा राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी पराभव केला. वहाळ गणात माजी सभापती सुरेश खापले यांना शिवसेनेचे संजय जावळे यांनी पराभूत केले. तर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्या दिशा दाभोळकर यांचा भाजपच्या रावी मोरे यांनी पराभव केला.
सत्तास्थापनेचे गणित अडले
चिपळूण पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यासाठी १० सदस्यांची आवश्यकता आहे. सध्याच्या निकालानुसार महायुतीकडे (शिवसेना–भाजप) सात, राष्ट्रवादीकडे सात, तर उबाठा गटाकडे चार जागा आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी आणि उबाठा गट एकत्र येणार की महायुती राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन करणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
