अलिबाग : अलिबाग नगर परिषदेच्या हद्दीतील अलिबाग कोळीवडय़ात नयमित पाणीपुरवठा करण्यात यावा या मगणीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे गुरुवारी (दि. १६ ) अलिबाग नगर परिषदेवर मार्चा काढण्यात आला. अलिबाग कोळीवाडय़ात मागील काही महिने अनियमित पाणीपुरवठा होत आहे. अलिबाग नगर परिषदतर्फे दोन दिवसांनी पाणीपुरवठा होतो. हे पाणीदेखील पिण्यास अयोग्य असते. कोळीवाडय़ात नियामित व पूर्ण दाबात पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी येथील नगरिक करत होते. अनेक निवेदने देण्यात आली. तरीदेखील अलिबाग नगर परिषदेने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरिकांनी गुरुवारी अलिबाग नगर परिषदेवर मोर्चा काढून आपला रोष प्रकट केला.

  भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, भाजप अलिबाग शहर अध्यक्ष अ‍ॅड. अंकित बंगेरा, भाजप ओबीसी सेल अलिबाग तालुका अध्यक्ष अशोक वारगे आदी या मोर्चात सहभागी झाले होते. अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांची अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अलिबाग कोळीवाडय़ातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची  मागणी केली.

  हा मोर्चा शांततेत काढण्यात आला आहे. जर येत्या सोमवापर्यंत कोळीवाडय़ातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अ‍ॅड. अंकित बंगेरा यांनी या वेळी दिला.  

‘‘ज्या वॉर्डामध्ये विरोधकांची ताकद आहे तेथील समस्या सोडविण्याकडे अलिबाग नगर परिषद जाणूनबूजून दर्लक्ष करते. अलिबाग शहरात अनेक समस्या आहेत. त्यापैकी पाण्याची समस्या गंभीर आहे. त्यामुळे पाण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. इतर समस्यांसंदर्भातदेखील भाजप आवाज उठवणार आहे.’’

– अ‍ॅड. महेश मोहिते, अध्यक्ष भाजप दक्षिण रायगड जिल्हा