Chandrakant Patil on PM Modi vs Nehru Record : जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूपच पुढे असल्याचे विधान भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा महायुती सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. नेहरू स्वातंत्र्याआधी जन्मले, तर मोदी यांनी आणीबाणीत संघर्ष केला. त्यामुळे मोदींची नेहरूंशी तुलनाच होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेतून चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यालाही प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान मोदी हे १० जून रोजी सर्वाधिक काळ लोकशाही पद्धतीने देश चालवणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले. यासह त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या ४,३९८ दिवसांच्या विक्रमालाही मागे टाकले. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर भाजपाच्या काही नेत्यांनी मोदींची तुलना थेट नेहरू यांच्याशी केली. त्यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रातील काही मंत्र्यांनी केलेले वक्तव्य आम्हाला अजिबात मान्य नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. “सध्या नेहरू आणि मोदी अशी अशी स्पर्धा लावली जात आहे. आता नेहरू यांच्यासोबत तुलना होऊ शकते का? अनेक वर्ष प्रधानमंत्री होते. इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचं काम नेहरू यांनी केले ते आपण विसरू शकत नाही. नेहरू हे नेहरू होते आणि त्यांच्याबरोबर कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, अशा शब्दांत पवारांनी तुलना करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना फटकारले होते. त्याबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी यावर भाष्य करत प्रतिक्रिया दिली.
“नेहरूंपेक्षा पंतप्रधान मोदी खूपच पुढे”
कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “नेहरू स्वातंत्र्याच्या आधी जन्माला आले आणि मोदी स्वातंत्र्यानंतर जन्माला आले, त्याला आपण काय करू शकतो? पण पंतप्रधान मोदी यांनी आणीबाणीमध्ये खूप संघर्ष केला. स्वातंत्र्यापूर्वी देशासाठी मेले पाहिजे हा तेव्हा नारा होता, आता देशासाठी चांगले जगले पाहिजे, असा नारा आहे. पंतप्रधान मोदींनी जगामध्ये देशाचे नाव चांगल्या पद्धतीने कमावले. त्यामुळे नेहरूंची त्यांच्याशी तुलनाच होऊच शकत नाही”. शरद पवार हे नेहमी गुगली टाकत असतात आणि त्यांना हेच म्हणायचे होतं की मोदी हे मोदी आहेत. त्यांची कशी नेहरूंबरोबर तुलना होईल? होऊच शकत नाही. असा उपरोधिक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला इतिहास
१० जून रोजी केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने आपला १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे व्यक्ती ठरले. त्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदी राहण्याच्या कार्यकाळाला मागे टाकले. भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविल्याबद्दल पंतप्रधान मोदींवर जगभरातून स्तुतीसुमने उधळली आणि त्यांच्या कारकिर्दीचा गौरव केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी २६ मे २०१४ पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर २०२४ साली सलग तिसऱ्यांदा ते या पदावर आरूढ झाले. तब्बल ४,३९९ दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. भारताचे माजी पंतप्रधान नेहरू ४,३९८ दिवस पंतप्रधानपदावर होते.
