Amit Satam Viral Video Controversy: मुंबई आणि मुंबई उपनगरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून ठिकठिकाणी झाड कोसळण्याच्या किंवा खड्ड्यांमुळे अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चेंबूर येथे २९ जून रोजी शाळेच्या बसवर झाड कोसळल्यामुळे एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर साकीनाका येथे २ जुलै रोजी एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या दोन घटनानंतर मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर टीका होत आहे. तसेच सामान्य मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण असतानाच लोकप्रतिनिधींमध्ये मात्र गांभीर्य नसल्याचे उदाहरण समोर आले.

मुंबईतील विधिमंडळात सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या दोन्ही घटनांवरून अधिवेशनात वादळी चर्चा झाली. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही मुंबई महानगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. त्यातच भाजपा मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्या एका व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त केला जात आहे. झाड कोसळण्याच्या आणि मॅनहोलच्या घटनेचा उल्लेख करून अमित साटम हसताना दिसत आहेत.

नेमके प्रकरण काय?

व्हायरल होत असलेल्या आणि विविध वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या व्हिडीओनुसार, आमदार अमित साटम हे विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार) जयंत पाटील यांच्याशी हास्यविनोद करताना दिसत आहेत. “काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं…”, असे बोलून ते हसतात.

एक लहान मुलगा झाड कोसळून मरण पावतो, दुसरीकडे उघड्या मॅनहोलमध्ये एका सामान्याला जीव गमवावा लागतो, अशा गंभीर घटनेवर आमदार ज्याप्रकारे हसून बोलत आहेत, ही बाब अनेकांना रुचलेली नाही. सोशल मीडियावर अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच विरोधकही टीका करत आहेत.

अमित साटम यावर काय म्हणाले?

दरम्यान व्हायरल व्हिडीओवरून टीका होऊ लागल्यानंतर आमदार अमित साटम यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न होत आहे. बातम्या देण्यापेक्षा बातम्या तयार करण्याचा प्रयत्न होत आहे”, असे सांगून अमित साटम यांनी त्या व्हिडीओमागची पार्श्वभूमी सांगितली.

साटम म्हणाले, “मॅनहोलच्या संदर्भात आमची चर्चा सुरू असताना जयंत पाटील त्याठिकाणी आले. त्यांनी म्हटले की, काल मी सभागृहात यासंदर्भात भाषण केले होते. त्यावर मी त्यांना म्हणालो की, काल झाड पडल्याबाबत बोललो होतो, आज मॅनहोलसंदर्भात माणूस पडल्याबाबत बोललो. त्यावर त्यांनी हसून दाद दिली आणि माझ्या पाठीवर थाप मारून ते निघून गेले. त्यानंतर मीही त्यांना स्मितहास्य करत प्रतिसाद दिला. माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी तोडून मोडून बातम्या देऊ नये, जी वस्तुस्थिती आहे, त्याला धरूनच बातम्या द्याव्यात.”