राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांचं समर्थन केलं असून भारतीय जनता पार्टी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांविरोधात टीकास्र सोडलं आहे. संजय राऊत हे भाजपाच्या विरोधात लिहायचे, म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अशा पद्धतीने कारवाया करून देशात सत्तेचा गैरवापर केला जात आहे. जो राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता भाजपाविरोधात भाष्य करतो, त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जाते, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

संजय राऊतांचं समर्थन केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांच्या अटकेला एक महिना पूर्ण झाल्यानंतर शरद पवारांना कंठ फुटला आहे, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- “उद्धवजी, मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? विधिमंडळात या आणि..”, भाजपाचं खुलं आव्हान!

शरद पवारांनी संजय राऊतांचं केलेल्या समर्थनाबाबत विचारलं असता भातखळकर म्हणाले की, “संजय राऊतांच्या अटकेला एक महिना पूर्ण झाल्यानंतर शरद पवारांना कंठ फुटला आहे. त्यांना न्यायालय, न्यायालयाची प्रक्रिया, न्यायालयाने त्यांना जामीन का नाकारला? किंवा ईडीने सादर केलेले पुरावे, याचं काही भान आहे की नाही, असा प्रश्न पडत आहे. संजय राऊतांचं समर्थन करण्याशिवाय शरद पवारांकडे दुसरा कोणताच मार्ग नाहीये. कारण संजय राऊत आणि शरद पवार किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे संबंध एकमेकांना सांभाळून दोघं मिळून खाऊ, अशा प्रकारचे आहेत” अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

हेही वाचा- “भाजपाची तळी उचलून…” राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावरून अंबादास दानवे यांचा हल्लाबोल!

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
पत्राचाळ मनी लॉंडरींग प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना मंगळवारी पुन्हा पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ केली. यापूर्वी न्यायालयाने संजय राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यापूर्वी ते ईडी (सक्तवसुली संचालनालय) कोठडीत होते.