भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने ठाकरे सरकावर विविध मुद्यांवरून टीका करत असतात. त्यांच्या टीकेवरून राजकीय वादंग देखील निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. आता देखील गोपीचंद पडळकर यांनी पदभरतीच्या मुद्य्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

“आघाडीसरकारमध्ये अनेक विभागात ११ हजार ३५१ पद रिक्त असताना, मात्र यांनी MPSC कडे फक्त ४ हजार २६४ पदांची मागणी केली. स्वतःच्या मुलांना आमदार-खासदार करण्यापुरते प्रस्थापितांकडे रिक्त पदं आहेत. बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता.” अशी जोरदार टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळक यांनी केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओत ते म्हणतात, “ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरचा जीव गमवावा लागला होता. तरी देखील या सरकारनं ना नियुक्त्या दिल्या ना पदभरती केली. आतातर वेगवेगळ्या २० विभागात जवळपास ११ हजार ३५१ पद रिक्त असताना, लोकसेवा आयोगाकडं केवळ ४ हजार २६४ रिक्त पदांच्या पदभरती करावी अशी मागणी सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. यापेक्षा कहर म्हणजे कोविडच्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागात जवळपास विविध श्रेणीतील २५०० च्या आसपास पदं रिक्त होती. तरी देखील अमित देशमुख यांनी कोणतीही पद भरतीची मागणी, सरकारकडे केली नाही. हीच परिस्थिती अनेक खात्यांची आहे. प्रशासन आणि सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नाही. मग हे काय फक्त टक्केवारीच्या फुगड्या खेळतायेत का?”

तसेच, “स्वत:ची मुलं आमदार, खासदार करण्यासाठी प्रस्थापितांकडं रिक्त जागा असतात, पण बहुजन समाजातील मुलांनी यांच्याच सतरंज्या उचल्याव्यात अशी यांची मानसिकता झालेली आहे.” असं देखील पडळकर म्हणाले आहेत.