scorecardresearch

“शरद पवारांनी खूप सोसलंय त्यामुळे तरूण पिढीला नशेत..”; वाइन विक्रीवरुन भाजपा आमदाराची टीका

फडणवीस परदेशात वाइन मालकांसोबतच्या बैठकीचा खुलासा करतील म्हणून संजय राऊत बावचळले आहेत, असेही भाजपा आमदारांनी म्हटले आहे.

BJP MLA Gopichand Padalkar criticizes the government for selling wine in supermarkets
फोटो सौजन्य- Indian Express)

राज्य सरकारने द्राक्षे बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना मिळावी, यासाठी मोठी किराणा दुकाने अथवा सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना फायदा व्हावा तसेच, वाइन उद्योगास चालना मिळावी या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नबाव मलिक यांनी दिली. मात्र राज्यातील भाजपा नेत्यांनी या निर्णयाला विरोध करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

“जनाब संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भीतीपोटी की ते परदेशात वाइन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’  झालं आहे. जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. गावच्या गावे अंधारात लोटली गेली आहेत. ऐन कापणीच्या हंगामात वीज तोडली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला,” असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.

सुपरमार्केटमधून वाईन विक्री : भाजपाचा महाराष्ट्रात विरोध मात्र मध्य प्रदेशात घरातूनच मद्यविक्रीला परवानगी

“जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर तुम्ही महाराष्ट्रात निर्माण झालेल्या वाइनलाच विक्रीची परवानगी असणार आहे आणि परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही हे तुम्ही नमूद करणार का? टक्केवारीसाठी वाइन ही दारू नव्हे असे संशोधन करणाऱ्यांचा मी निषेध करतो असे,” गोपीचंद पडळकर म्हणाले.  

“काही नुकसान झालेले नाही उलट…”; विदेशी मद्याच्या किमती कमी करण्यावरुन अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

“शरद पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. मला खात्री आहे की जे पवारांनी आयुष्यात खूप सोसलं आहे आणि त्याची खंतही जाहीरपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या तरूण पिढीला नशेत ढकलण्याची भूमिका कधीही घेणार नाहीत,” असे पडळकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सुपर मार्केटमध्ये दारूविक्रीची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयास भाजपाने कडाडून विरोध केला आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त असून काही जिल्ह्यातील दारूबंदी संपवून नवीन दारूविक्री परवाने देण्यात आले. आता तर सुपर मार्केटमध्ये दारूविक्रीला परवानगी देऊन घरोघरी दारू पोचवण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे, असा सवाल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

भाजपाने या निर्यणाला विरोध केल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. फडणवीस सरकारने दारूची होम डिलिव्हरी ऑनलाइन करण्याचे धोरण आखले, मग त्याचे काय झाले? भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा दारू हे औषध आहे आणि ते कमी प्रमाणात प्या, असे म्हणाल्या आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla gopichand padalkar criticizes the government for selling wine in supermarkets abn