गेल्या सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी राज्य शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. न्यायालयानं हे शक्य नसून ज्यावर राज्य सरकारने सहमती दर्शवली आहे ते घेऊन २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे देखील निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यानंतर देखील शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांनी मोठं आंदोलन केलं. यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपा आमदार आणि सुरुवातीच्या काळात एसटी कर्मचारी आंदोलनाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारे गोपीचंद पडळकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं, तेव्हा सुरुवातीच्या काळात भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे कर्मचाऱ्यांसोबत होते. जवळपास दोन आठवडे या दोघांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात ठिय्या मांडून जोरकसपणे मागण्या मांडल्या. मात्र, राज्य सरकारकडून वेतननिश्चिती आणि पगाराबाबत हमीचं आश्वासन मिळाल्यानंतर या दोघा नेत्यांनी आंदोलकांना माघार घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर देखील आंदोलकांनी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर त्यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला होता.

शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनावर उदयनराजेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “या जन्माचं कर्म…!”

“एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केली होती की…”

“ज्या दिवशी आम्ही या आंदोलनातून बाहेर पडलो, २६ नोव्हेंबर २०२१ ला… तेव्हापासून परवा न्यायालयाचा निकाल येईपर्यंत.. तेव्हा जे आमचं ठरलं होतं त्यापेक्षा वेगळं काहीही पाच महिन्यांत घडलेलं नाही. एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही विनंती केली होती की यापेक्षा वेगळं काही होणार नाही. पण कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. पण आम्ही प्रामाणिकपणे कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरली. मी आणि सदाभाऊ खोत १६ दिवस आझाद मैदानावर आंदोलकांसोबत होतो”, असं गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.

“नंतरच्या काळात सरकार आणि कर्मचारी यांच्यामध्ये कोणतीही सहमती झाली नाही आणि सरतेशेवटी हे आंदोलन भरकटलेल्या दिशेनं गेलं आहे”, अशी टिप्पणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या आंदोलनावरून देवेंद्र फडणवीसांनी मुंबई पोलिसांवर ओढले ताशेरे; म्हणाले…

“पोलिसांचा तपास होईपर्यंत…”

दरम्यान, यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनाविषयी भूमिका मांडली. “जे घडलं, त्याबाबतीत पोलीस यंत्रणा तपास करेल. त्यांचा तपास होईपर्यंत यावर काही बोलणं योग्य होणार नाही”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.