scorecardresearch

“मी आमदार झाल्यापासून जयंत पाटलांना सुचायचं बंद झालंय”, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका!

पडळकर म्हणतात, ” हे रडीचा डाव खेळायला लागले आहेत. पालकमंत्री रात्रभर झोपलेच नाहीयेत तर काय करायचं?”

patil-padalkar

सांगलीतील अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणाचा वाद आता चांगलाच पेटू लागला आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते या स्मारकाचा लोकार्पण सोहळा करण्याचं नियोजन झालेलं असताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. मेंढपाळाच्या हस्तेच लोकार्पण सोहळा व्हायला हवा, अशी भूमिका पडळकर यांनी मांडली असून आजच संध्याकाळी ४ वाजता हा लोकार्पण सोहळा होईल, असं पडळकरांनी स्पष्ट केलं आहे. याचसंदर्भात बोलताना पडळकरांनी सांगलीचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर खोचक निशाणा साधला आहे.

“पालकमंत्री रात्रभर झोपलेच नाहीत”

पोलीस प्रशासन किंवा नेतेमंडळींनी कितीही विरोध केला, तरी आज संध्याकाळी ४ वाजता हा लोकार्पण सोहळा पार पडेल, असं पडळकर म्हणाले आहेत. “माध्यमांना कार्यक्रमासाठी बंदी घालायचं काय कारण? हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे. हे रडीचा डाव खेळायला लागले आहेत. पालकमंत्री रात्रभर झोपलेच नाहीयेत तर काय करायचं. एसपींना झोपू देत नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांना झोपू देत नाहीत. पोलिसांना उन्हा-तान्हाचं तिथे तैनात ठेवलंय. काय कारण आहे?” असं पडळकर सांगलीत बोलताना म्हणाले आहेत.

“कशासाठी अट्टाहास?”

“जयंत पाटलांना मी आमदार झाल्यापासून सुचायचं बंद झालं आहे. बैलगाडा शर्यतीच्या वेळीही त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. २० किमी परिघात सगळे पोलीस लावले होते. जिथे शेतकऱ्यांचे बैल होते, तिथे २-२ पोलीस बैलं राखायला होते. तरी बैलगाडा शर्यत झाली. एकदा लोकांची भावना असेल, तर तिथे तुम्ही ती दाबू शकत नाही. आत्ता स्मारकाच्या बाबतीत लोकभावना अशी आहे की मेंढपाळांच्या हस्ते लोकार्पण झालं पाहिजे, शरद पवारांच्या हस्ते नको. एवढं जर तुम्हाला कळत असेल, तरी तुम्ही कशासाठी अट्टाहास धरत आहात?” असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला आहे.

अहिल्यादेवींच्या स्मारक लोकार्पणाचा वाद चिघळला ; सांगलीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष

“लोकार्पण होणार हे पालकमंत्र्यांना माहिती आहे”

दरम्यान, काहीही झालं, तरी आज लोकार्पण होणार हे पालकमंत्र्यांना माहिती असल्याचं गोपीचंद पडळकरांनी नमूद केलं आहे. “कार्यकर्त्यांना आत येऊ दिलं जात नाहीये. तरी कार्यकर्ते इथे आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही स्मारकाचं लोकार्पण करणार आहे. पालकमंत्र्यांना देखील माहिती आहे की हे लोकार्पण करणार आहेत. त्यामुळे माध्यमांनी ते दाखवू नये, म्हणून माध्यमांना तिथे मनाई करण्यात आली आहे”, असं पडळकर यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla gopichand padalkar slams ncp jayant patil sangli ahilyadevi holkar statue pmw

ताज्या बातम्या