चाळीसगावचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी स्टिंग ऑपरेशन करुन पोलिसांकडून कन्नड घाटात केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर वसुलीबद्दल धक्कादायक खुलासा केलाय. या घाटामधून जाणाऱ्या प्रत्येक अवजड वाहनाकडून पोलीस बेकयादेशीरपणे पैसे घेत असल्याचे काही व्हिडीओ चव्हाण यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट केलेत. विशेष म्हणजे आमदार चव्हाण यांनी स्वत: ट्रक चालक म्हणून या घाटातील नाकाबंदीमधून जाताना कशाप्रकारे लाच द्यावी लागते हे दाखवण्यात आलं आहे. हे व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून भाजपा समर्थकांनी आमदार चव्हाणांनी केलेल्या या स्टिंग ऑपरेशनवरुन त्यांचं कौतुक केलं आहे.

यासंदर्भातील व्हिडीओ चव्हाण यांनी शूट केले असून ते सविस्तर माहितीसहीत फेसबुकवर पोस्ट केलेत. “दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होऊन ५ ते १० तास घाट जाम होतो. गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका तासंतास अडकून पडतात, यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव खराब होत आहे,” असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. केवळ वसुलीसाठी प्रवाश्यांच्या जीवाशी सुरू असलेल्या खेळाचा स्टिंग ऑपरेशन करत पर्दाफाश करण्यात आल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

“महावसुली आघाडी सरकारच्या आशिर्वादाने चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, याची खातरजमा करण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसह काल (२४ नोव्हेंबर २०२१ च्या) रात्री वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. यावेळी मी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला असता त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी माझ्याकडे जाताना व येताना ५०० रुपयांची मागणी केली असता त्यांना मी यात थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला. नंतर मी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला मग मी देखील पोलिसांची मग्रुरी पाहून खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी मला ओळखले व त्यांनी पळ काढला,” असं आमदार चव्हाण यांनी घडलेल्या घटनाक्रमाबद्दल बोलताना सांगितलं आहे.

Salman Khan shooting case accused was found after calling the brother
सलमान खान गोळीबार प्रकरण : भावाला दूरध्वनी केल्यामुळे आरोपी सापडले
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!
Dog Shot By Police Officer Over 30 Times
धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याने कुत्र्यावर झाडल्या ३० पेक्षा जास्त गोळ्या, तरीही वाचला त्याचा जीव; काय आहे प्रकरण?

“सचिन वाझे जेलमध्ये गेल्याने १०० कोटींचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी ठिकठिकाणी अश्या वसुल्या सुरु आहेत की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे, एकीकडे चाळीसगाव तालुक्यात शेतकऱ्यांचे गुरे चोरीला जात असताना तिथे बंदोबस्त करायला पोलिसांना वेळ नाही. महावसुली आघाडी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडत आहेत. १५ दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी संपाकडे कानाडोळा करतात मात्र पोलिसांच्या मार्फत महावसुली जोरात सुरु आहे. आज जिल्हा पोलीस अधिक्षक महोदय यांनी सदर घटना व माझ्या तक्रारी च्या अनुषंगाने जळगाव येथे सर्व प्रमुख पोलीस अधिकारी यांची बैठक बोलावली असून मी त्याठिकाणी चाळीसगांव तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे, हफ्ता वसुली, शेतकऱ्यांचे गुरे चोरी जाण्याचे वाढलेले प्रमाण, घरफोडी, चोरी, महिला व अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार या अनुषंगाने चाळीसगांव वाश्यांच्यावतीने माझी भूमिका मांडणार आहे,” असंही चव्हाण म्हणाले आहेत.

या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महामार्गांवर पोलिसांकडून बेकायदेशीरपणे वाहनचालकांकडून पैसे घेण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे.