Narendra Mehta slams Pratap Sarnaik: यंदाच्या दहीहंडी उत्सवात मराठी भाषेच्या आग्रहावरून सुरू असलेल्या विषयाचे पडसाद ठाण्यात उमटलेले पाहायला मिळाले. अभिनेता सुनील शेट्टीने शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांच्या दहीहंडी उत्सवात हजेरी लावल्यानंतर मराठीमध्ये संवाद साधत उपस्थितांची मने जिंकली. तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडी उत्सवात अभिनेता संजय दत्तने मराठी येत नसल्याचे सांगितले. यावरून आता भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर टीका केली आहे.
प्रकरण काय?
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांनी प्रवाशांबरोबर मराठी भाषेत संवाद साधावा यासाठी मोहीम उघडली आहे. या मोहिमेवर भाजपाने सावध पवित्रा घेतला असून मराठी भाषा सक्तीला समर्थन दिलेले नाही. रिक्षा-टॅक्सी चालकांना आता मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे.
रविवारी दहीहंडी उत्सवानिमित्त प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीला अभिनेता संजय दत्तने भेट दिली. यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले, “आमच्या दहीहंडीला अभिनेता सुनील शेट्टी, क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव येऊन गेला. सर्वांना आम्ही मराठीत संवाद करण्याचा आग्रह केला. सध्या मी सर्वांना मराठी शिकवत आहे. त्यामुळे संजय दत्तही आधी आपल्याशी मराठीतून थोडे बोलतील आणि नंतर हिंदीत बोलतील.”
प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनंतर संजय दत्त सुरुवातीला, ‘तुम्हा सर्वांना नमस्कार’, हे वाक्य मराठीत म्हणाला. त्यानंतर त्याने सांगितले, “प्रतापभाई, मी सहा वर्ष पुण्याच्या येरवडा तुरुंगात राहिलो. तेव्हाही मराठी शिकू शकलो नाही.” यानंतर प्रताप सरनाईक हे स्मितहास्य करतात.
पाहा व्हिडीओ
कुछ दिन पहले तक ऑटो-टैक्सी वालों को मराठी सिखाने के लिए नियम-कानून की बात हो रही थी।दही हांडी के मंच पर संजय दत्त से मराठी में बोलने की गुजारिश हुई तो जवाब मिला “6 साल येरवडा जेल में रहने के बाद भी मराठी नहीं सीख पाया।जवाब सुनकर प्रताप सरनाईक ठहाके लगाकर हंस पड़े #pratapsarnaik pic.twitter.com/5Jff96fKFd
— Rajesh kumar (@journorajeshk) September 6, 2026
नरेंद्र मेहतांची टीका
ठाण्यातील मीरा रोड विधानसभेचे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रकारावरून प्रताप सरनाईक यांना लक्ष्य केले. “एखादा सिनेकलाकार मला मराठी येत नाही, हे तुमच्याच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सांगतो. तेव्हा तुम्ही त्यावर हसता. पण जेव्हा सामान्य रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी येत नाही म्हटले तर त्याला तुम्ही दमदाटी करता. हा कुठला न्याय आहे. तुमच्या व्यासपीठावर अभिनेता मराठी येत नाही म्हटल्यावर त्याला तुम्ही टोकतही नाही. प्रताप सरनाईक यांच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे.”
संजय राऊत यांचीही टीका
संजय राऊत यांनाही याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. “प्रताप सरनाईक यांनी रिक्षावाल्यांना मराठी यायला पाहिजे, म्हणून कठोर कारवाईचे आदेश दिले होते. पण अमित शाहांनी ते मोडून काढले. यांचा सगळा कारभारच हास्यास्पद आहे. सरनाईक यांनी संजय दत्तला तिथेच थांबवायला हवे होते. तुम्ही महाराष्ट्रात राहत असून ठाण्यात उभे आहात, हे सांगायला हवे होते. पण हे ढोंगी लोक आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.
