BJP MLA Prakash Bharsakale on Akola Politics : अकोल्याच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ चालू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. करोना काळात अकोल्यामध्ये उपचार चालू असताना आपल्याविरोधात घातपाताचा प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते म्हणाले, “काही राजकीय व पक्षांतर्गत विरोधक मी मरावं म्हणून वाट पाहात होते.” अकोट येथील प्रचारसभेत ते बोलत होते.

आमदार प्रकाश भारसाकळे म्हणाले, “मला करोना झाला होता तेव्हा उपचारांदरम्यान काहींचा माझ्याविरोधात घातपाताचा प्रयत्न होता. मी अकोल्यातील एका रुग्णालयात उपचार घेत होतो. तेव्हा उपचारांरम्यान अचानक माझं अन्न बंद करण्यात आलं. तेव्हा मला व माझ्या कुटुंबियांना संशय आला. दाल में कुछ काला है असं वाटलं. मी मरावं याची काहीजण वाट पाहात होते. मात्र, जनतेच्या आशीर्वादाच्या बळावरच मी या संकटातून सुखरूप बाहेर पडू शकलो.”

अकोटची भूमी सोडणार नाही : आमदार प्रकाश भारसाकळे

यावेळी भारसाकळे यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “माझी पत्नी मला सांगत होती अकोल्यात योग्य उपचार होत नाहीयेत. तिने मला तातडीने नागपूरला हलवण्यास सांगितलं. मात्र, इथल्या जनतेचं प्रेम व आशीर्वादामुळे मी इथेच उपचार घेतले आणि बरा झालो. त्यामुळे मी कधीच अकोटची भूमी सोडणार नाही.”