scorecardresearch

राज्य सरकारच्या निषेधात भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी केलं मुंडन; म्हणाले, “उद्धव ठाकरे आदिलशाहाच्या…!”

प्रसाद लाड म्हणतात, “बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसच्या मांडीवर बसून…”

prasad lad targets uddhav thackeray
प्रसाद लाड यांनी राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मुंडन केलं आहे.

येत्या ८ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेली जमावबंदी आणि गुढीपाडव्यासाठीच्या शोभायात्रांविषय अद्याप स्पष्ट निर्देश नसल्यामुळे त्यावर सध्या चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांकडून राज्य सरकार हिंदू सणांना का विरोध करतंय? असा प्रश्न उपस्थित करत असताना आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी चक्क मुंडन केलं आहे. यासंदर्भात प्रसाद लाड यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करतानाच राज्य सरकारवर शेलक्या शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

जमावबंदीच्या आदेशांनंतर विरोधक आक्रमक!

राज्य सरकारने ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे यादरम्यान येणाऱ्या गुढीपाडवा आणि रामनवमी हे सण साजरे करण्याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. गुढीपाडवा कशा प्रकारे साजरा करायचा? याविषयी उद्या मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केलं आहे. मात्र, या मुद्द्यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. “हिंदू सणांचा विषय येतो त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला असताना प्रसाद लाड यांनी चक्क मुंडन करून निषेध केला आहे.

हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, भाजपाचा सवाल

“ज्या पद्धतीने सरकारने गुढीपाडव्याच्या उत्सवाला बंदी घातली, जमावबंदीचे आदेश दिले त्याचा मी निषेध करतो. मराठी आणि हिंदू सणांवर अशा प्रकारे बंदी घालून उद्धव ठाकरे सरकार आदिलशाहाच्या सरकारचं दर्शन देतायत का? असं आता आम्हा हिंदूंना वाटायला लागलं आहे”, असं प्रसाद लाड यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

“उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर बसून…”

“बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसच्या मांडीवर बसून मराठ्यांची आणि हिंदूंची चेष्टा करतील असं कधीच आम्हाला वाटलं नव्हतं. त्यामुळे हिंदूंच्या सणांवर बंदी घातल्यामुळे मी मुंडन करून या सरकारचा निषेध केला आहे”, असं देखील प्रसाद लाड म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla prasad lad targets uddhav thackeray government pmw