विखे यांची टीका : आरक्षणासंदर्भात आघाडी सरकार गंभीर नव्हते

राहाता : ‘‘ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार कधीच गंभीर नव्हते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालनही सरकार करू शकले नाही. मराठा आरक्षणाप्रमाणेच ओबीसीचे आरक्षण घालविण्याचे पाप या तिघाडी सरकारने केले आहे. कोणताही जनाधार नसलेल्या सरकारचे फक्त ‘वर्क फ्रॉम जेल’ सुरू असल्याने या सरकारकडून कोणत्याच समाजघटकांना न्याय मिळू शकत नसल्याचा आरोप आमदार राधाकृष्ण विखे यांनी केला.

ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याच्या कारणाने आज, शुक्रवारी शिर्डी येथील प्रांत कार्यालयाच्या समोर भाजपओबीसी आघाडीतर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन करण्यात आले. या उपोषणाची सांगता सायंकाळी आ. विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

आपल्या भाषणात विखे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणावर जोरदार टीका करून या सरकारने ओबीसी समाजाची मोठी फसवणूक केल्याचा आरोप केला. या वेळी ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर शहराध्यक्ष सचिन शिंदे यांची भाषणे झाली. प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना ओबीसी आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष स्वानंद रासने, सचिन तांबे, अशोक पवार, मधुकर कोते, विलास विनायक कोते, नरेश सुराणा, सोमराज कोते आदी उपस्थित होते.