भाजपाचा ‘बेटी भगाव’ कार्यक्रम आहे का? : उद्धव ठाकरे

भाजपाच्या आमदाराने तारे तोडले असून राम कदम असो किंवा प्रशांत परिचारक किंवा छिंदम ही हीन वृत्तीची माणसे आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

माताभगिनींचा अपमान करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाई करावी अशी मागणी करतानाच अन्य पक्षांनीही त्यांना उमेदवारी देऊ नये, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. भाजपाच्या आमदाराने तारे तोडले असून राम कदम असो किंवा प्रशांत परिचारक किंवा छिंदम ही हीन वृत्तीची माणसे आहेत. वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपात आहे असे त्यांचे नेते सांगतात. पण हा वाल्मिकी ऋषींचा अपमान आहे, असे त्यांनी सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राम कदम यांच्या विधानाचा समाचार घेतला.  मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांच्या विधानाची दखल घेतली पाहिजे. नितीन गडकरी म्हणाले होते की वाल्याचा वाल्मिकी करण्याची आमच्यात ताकद आहे. तर अशा नवं वाल्मिकींचं रामायण बघितलं तर भाजपाने आता कार्यक्रम बदलायला पाहिजे. त्यांनी आता ‘बेटी भगाव’ असा नवा कार्यक्रम त्यांनी दिला आहे का?, असा सवाल त्यांनी विचारला. मुख्यमंत्र्यांनी धाडस दाखवत राम कदम यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्यांना अन्य पक्षांनीही उमेदवारी देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. राम कदम असो किंवा प्रशांत परिचारक किंवा छिंदम हे तिघेही एकाच माळेचे मणी असून त्यांना माफी म्हणजे वाल्मिकी ऋषींचा अपमान आहे, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी हार्दिक पटेलशी मी फोनवरुन चर्चा केली. तो १२ दिवसांपासून उपोषणाला बसला आहे. त्याने उपोषण सोडावे असे आवाहन केल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले. हार्दिक पटेल हा लढवय्या असून लढवय्या कधी उपोषण करत नाही, असे त्यांनी नमूद केले. पाकिस्तानशी चर्चेची तयारी दर्शवणाऱ्या भाजपा सरकारने हार्दिक पटेलसारख्या देशातील तरुणांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. त्यांच्याशीही चर्चा केली पाहिजे, असे ते म्हणालेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp mla ram kadam controversy shiv sena party chief uddhav thackeray demands action