MLA Ram Kadam mother death vs Pigeon health hazards Mumbai: मुंबईतील दादर येथे असलेल्या कबुतरखान्याचा प्रश्न काही महिन्यांपूर्वी वादात अडकला होता. कबुतरामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो, असा दावा काहींनी केला होता. त्यातच कबुतरखाना बंद केल्यामुळे जैन धर्मियांनी याविरोधात आंदोलन पुकारले होते. कबुतरामुळे खरंच आरोग्याला धोका निर्माण होतो, याची चर्चा असतानाच भाजपाचे आमदार राम कदम यांनी विधानसभेत कबुतरांमुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचा दावा केला. कबुतरांमुळे झालेल्या आजारावर उपचार नसल्यामुळे आईचा मृत्यू झाला, हे सांगताना ते आक्रमक झाले आणि कबुतरांना मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हलविण्याची मागणी त्यांनी केली.

राम कदम नेमके काय म्हणाले?

भाजपाचे घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम म्हणाले की, ज्या आईने मला जन्म दिला. तिचे १२ जून रोजी निधन झाले. या जगात मृत्यू कुणालाही चुकला नाही. माझ्या आईने आयुष्यभर नामस्मरण केले. सर्वांचे भले होवो, चांगले होवो, हे तिच्या मुखात असे. पण तिला आयुष्याची शेवटची दोन वर्षे मरणासन्न यातना भोगाव्या लागल्या. माझ्या आईच्या बाबतीत जे घडले, ते कुणाच्याही आईबरोबर घडू नये, यासाठी मी हा मुद्दा मांडत आहे.

राम कदम पुढे म्हणाले, “माझ्या आईला फुफ्फुसाचा आजार झाला होता. ज्याला वैद्यकीय भाषेत आयएलडी म्हणतो. या आजाराला जगात औषध नाही. हा आजार झालेल्या रुग्णाला २४ तास ऑक्सिजनवर ठेवले जाते. फुप्फुसांमधील फायब्रोसिस वाढू नये, यासाठी जुजबी औषधे मिळतात. पण आजार वाढत गेल्यानंतर सहन न होणाऱ्या वेदना होतात. माझी आई पंधरा मिनिटे न थांबता खोकत होती. खोकता खोकता ती बेशुद्ध व्हायची. भारतात दरवर्षी नऊ लाख रुग्ण या आजाराला बळी पडतात.”

former pune corporator who lost daughter to pigeon borne infection
‘कबुतराच्या विष्ठेमुळे जीव जातो, लोकांना हे कळायला हवं’, मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर पुण्यातील माजी नगरसेवकाकडून जनजागृती (बातमी वाचण्यासाठी क्लिक करा)

‘कबुतरांना राष्ट्रीय उद्यानात हलवा’

सदर आजार कबुतराच्या विष्ठेतून होत असल्याची माहितीही राम कदम यांनी विधानसभेत दिली. यावर त्यांनी काही उपायही सुचवले. कबुतरांना दाणे देणे रातोरात बंद करा, असे मला अजिबात म्हणायचे नाही. दादरचा कबुतरखाना बंद केल्यामुळे तिथे अनेक कबुतरांचे जीव गेले. कबुतरांनाही जगण्याचा अधिकार आहे. विदेशात कबुतरांबाबत स्थलांतर, जन्मावर नियंत्रण असे उपाय योजले जातात. मुंबईतील राष्ट्रीय उद्यानात ५० हजार एकरची जागा आहे. तिथे आपण कबुतरांचे स्थलांतर केले तर मुंबईतील कोट्यवधी लोकांना या आजारापासून वाचवता येईल, अशी मागणी त्यांनी केली.

राम कदम यांनी आपली मागणी मांडल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य शासनाला यावर विचार करण्याचे निर्देश दिले. समिती स्थापन करून यावर योग्य ती कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.

राम कदम खोटे बोलत आहेत – जैन मुनी

राम कदम यांनी आपल्या आईच्या निधनाचा हवाला देऊन कबुतरांचा विषय मांडल्यानंतर जैन धर्मगुरू निलेशचंद्र मुनी यांनी त्यांना आव्हान दिले. “राम कदम खोटे बोलत आहेत. राम कदमांच्या आईचे निधन कबुतरांमुळे झाले असेल तर त्यांनी तसे पुरावे द्यावेत. राम कदम यांच्या आईच्याच नाही तर प्रत्येकाच्या आईचा मुद्दा महत्त्वाचा असतो. त्यांनी आईच्या मृत्यूचा विषय विधानसभेत मांडायला नको होता”, असे विधान निलेशचंद्र मुनी यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना केले.