सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कर्तृत्ववान उद्योजक आहेत. विशेषतः गारमेंट उद्योजकांची संख्या मोठी आहे. या उद्योजकांना आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आगामी काळात दुबईमध्ये सुसज्ज व्यासपीठ तयार करण्याचा मानस भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी बोलून दाखविला आहे.
सोलापूर सोशल फाउंडेशन, उद्योग फाउंडेशन आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक उद्योजकांचे शिष्टमंडळ दुबई दौऱ्यावर गेले होते. या शिष्टमंडळाने सोलापुरात परत आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी बोलताना आमदार देशमुख यांनी दुबई भेटीचा वृत्तान्त सांगितला.
ते म्हणाले, दुबईस्थित उद्योजकांनी दर्जात्मक उत्पादन देण्याच्या अटीवर सोलापूरच्या उद्योग वाढीसाठी सकारात्मकता दर्शविली आहे. मुंबईमध्ये पुरेशी जागा घेऊन तेथे सोलापूरच्या दर्जेदार उत्पादनांची साठवणूक करून आंतरराष्ट्रीय व्यापार विकसित करण्यास सहकार्याचा हात पुढे केला आहे.सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे संचालक अमित जैन यांनी दुबई भेटीची सविस्तर माहिती दिली. सोलापूरच्या उद्योजकांनी दुबईमध्ये सुरक्षा व्यवसाय प्रमुख संतोष कोरट यांच्याशी सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने सोलापूरचे आयटी हब कसे निर्माण करता येईल, यावर चर्चा केली.
जुई केमकर आणि जितेन दमानिया यांच्याशी अन्नउद्योग क्षेत्रात सोलापूरच्या कृषी उत्पादनांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी संवाद साधण्यात आला. सोलापूरसाठी दुबईमध्ये डिझाईन ऑटोमेशन क्षेत्रात तरुणांना संधी असल्याचे दुबईस्थित सागर कुलकर्णी यांनी सांगितले. सोलापूरच्या शिष्टमंडळाने दुबईत ३२ उद्योजकांची भेट घेऊन संबंधित उद्योगाच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा केली. या चर्चेतून सोलापूर दुबई बिझनेस फोरम तयार करण्याचे ठरले, असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.