scorecardresearch

“मला फक्त ५० कोटी द्या, मी घरा-दारासकट…”, भाजपा आमदार सुरेश धस यांची जाहीर सभेत टोलेबाजी!

भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पाटोदामध्ये केलेलं एक विधान भलतंच चर्चेत आलं आहे.

bjp mla suresh dhas on corruption allegations
सुरेश धस यांनी आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

बीडमधल्या देवस्थान जमिनीचा घोटाळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड. असीम सरोदे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन या जमीन घोटाळ्यासंदर्भात भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केले होते. आष्टीमधल्या देवस्थान आणि इनामी जमिनीपैकी काही जमीन खोट्या कागदपत्रांच्या मदतीने लाटल्याचा आरोप सुरेश धस यांच्यावर करण्यात आल्यानंतर त्यांनी या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं आहे. पाटोद्यामध्ये आयोजित एका जाहीर सभेत बोलताना सुरेश धस यांनी याबाबत केलेली टिप्पणी ऐकून सभेत एकच हशा पिकला!

“जरा हिसाबात बोला”

सदर जमिनीची किंमत एक हजार कोटींच्या घरात असल्याचा दावा करण्यात आला असून त्यावरून सुरेश धस यांनी खोचक टोला लगावला आहे. “काय भाषण काय बोलणं.. शोभतंय का? बोलण्याचं पिल्लू आहे का काय? थोडं हिसाबात बोला. टीका-टिप्पणी करताना उगीच दुसऱ्या अपमान करायचा असं काहीही बोलायचं. तुमचं सरकार आहे, करा चौकशा, करा तपास, उगीच ढगात गोळ्या मारण्याचं काम करू नका”, असं सुरेश धस म्हणाले.

“हजार कोटी म्हटल्यावर मी म्हटलं…”

दरम्यान, आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना सुरेश धस यांनी थेट आव्हान दिलं आहे. “तिकडे औरंगाबादला पत्रकार परिषदा घ्यायच्या..इकडं भ्रष्टाचार, तिकडं आमकं.. माझ्याकडे आकडा हजार कोटींचा सांगितला. हजार कोटी म्हटल्यावर मी म्हटलं सोडून जातो”, असं ते म्हणाले.

“मला एवढे हजार कोटी नको. मला पन्नासच कोटी द्या. माझ्या बाप-दाद्याची जी काही संपत्ती आहे, तुम्ही म्हणता मी कमावलेली आहे, ती घरादारासकट तुमच्या नावावर करून देतो. आख्खा जिल्हा सोडून जातो. पन्नास द्या. हजार कशाला?” असा टोला सुरेश धस यांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-12-2021 at 15:56 IST