Suresh Dhas : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं. मात्र, या प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचाही सहभाग संतोष देशमुख हत्या प्रकरणात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तपास यंत्रणांकडून सुरु आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णु चाटेच्या नावावर ४६ कोटी रुपयांची बिले काढण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. तसेच परळी नगरपरिषदेचं स्पेशल ऑडिट करण्यात आलं पाहिजे, अशी मोठी मागणीही सुरेश धस यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. तसेच एका पोलिसाकडे १५ जेसीबी आणि १०० हायवा असल्याचं मोठं विधानही त्यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

सुरेश धस काय म्हणाले?

“परळी तालुका, परळी ग्रामीण, सिरसाळा पोलीस ठाणे येथे १० ते १७ वर्षांपासून असणाऱ्या सर्व पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या करण्यात आल्या पाहिजेत. तसेच वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे पुरावे आम्ही पोलिसांना दिले आहेत. त्या सर्वांना सहआरोपी करण्यात आलं पाहिजे. तसेच परळी नगरपरिषदेचं स्पेशल ऑडिट करण्यात आलं पाहिजे. कारण एका व्यक्तीच्या नावावर ४६ कोटी रुपयांची बिलं काढण्यात आलेली आहेत. विष्णु चाटे सारख्या आरोपीच्या नावावर हे बिलं काढले गेले आहेत. तसेच एकाच रस्त्यावर पाचवेळा बिलं काढले गेले आहेत”, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.

‘एका पोलिसाकडे १५ जेसीबी आणि १०० हायवा’

“करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तुल ज्या व्यक्तीने ठेवलं तो व्यक्ती कोण आहे, तर एक पोलीस आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात आली पाहिजे. तसेच यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना बडतर्फ करण्यात आलं पाहिजे. एक पोलीस अधिकारी गेल्या १५ वर्षांपासून एकाच ठिकाणी आहे. त्याचे स्वत:चे १५ जेसीबी आणि १०० हायवा आहेत. तसेच परळीमध्ये थर्मलमध्ये काही अधिकारी २० वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करत आहेत. त्या थर्मलमध्ये आजही जे अवैध राखेचे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात आले पाहिजेत. यामध्ये कोणकोणाची नावे आहेत याची यादी मी पोलिसांना देणार आहे”, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

व्हायरल क्लिपबाबत सुरेश धस काय म्हणाले?

“आकाच्या व्हायरल क्लिप आता बाहेर येत आहेत. सध्या व्हायरल होणारी क्लिप पुढील १० ते १५ दिवस चालणार आहे. माझी विनंती आहे की त्या क्लिपमधील त्या महिला अधिकारी कोण आहेत? ज्यांना आकाने फोन केलेला आहे. तसेच त्यामध्ये तो आरोपी कोण आहे? तसेच किरकोळ केस आहे असं कोण म्हणालं आहे? आकाने कोणत्या अधिकाऱ्याला फोन केला? याविषयी मी नंतर सविस्तर बोलणार आहे”, असंही सुरेश धस म्हणाले.

मुख्यमंत्री बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ५ फेब्रुवारीला बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघात काही विकास कामांसंदर्भातील कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीत येणार असल्याचंही सुरेश धस यांनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla suresh dhas on santosh deshmukh case vishnu chate and parli municipal council beed politics gkt