scorecardresearch

Wardha Accident: “आज काळीज फाटलं…”; एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूनंतर भाजपा आमदाराची भावूक पोस्ट

आविष्कार हा तिरोडा गोरेगावचे भाजपाचे आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा होता.

BJP, Wardha Accident, BJP MLA Vijay Rahangdale
आविष्कार हा तिरोडा गोरेगावचे भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा होता.

वर्ध्यात मंगळवारी गाडी पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. वर्धा-देवळी मार्गावरील सेलसुरा येथे पुलावरून झायलो वाहन ४० फूट खाली कोसळून हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये भाजपाचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश होता. अपघात इतका भीषण होता की, सर्वांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान एकुलच्या एक मुलाच्या मृत्यूनंतर भाजपा आमदार विजय रहांगडाले यांना फेसबुकला भावूक पोस्ट शेअर केली आहे.

PHOTOS: मित्राचा वाढदिवस, सेलिब्रेशन आणि अपघात…; वर्ध्यात सात मित्र जागीच ठार; संपूर्ण महाराष्ट्र हळहळला

मृतांमध्ये नीरज चव्हाण (गोरखपूर), विवेक नंदन (गया), पवन शक्ती (गया), आविष्कार रहांगडाले (तिरोडा), प्रत्यूश सिंग (गोरखपूर), शुभम जयस्वाल (चंदोली), नितेशकुमार सिंग (ओडिशा) यांचा समावेश आहे. हे सर्व वैद्यकीय शाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षांचे विद्यार्थी होते. आविष्कार हा तिरोडा गोरेगावचे भाजपाचे आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा होता.

मुलाच्या जाण्याने धक्का बसलेल्या विजय रहांगडाले यांनी फेसबुकला एक कविता शेअर करत आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे.

कवितेत काय म्हटलं आहे ?

आज काळीज फाटलं,
त्यानं आकाश गाठलं;

अविष्कार आमचा हिरा,
होता आनंदाचा झरा;

डॉक्टर नव्हते खमारी गावात,
होती खंत आणि हुरहूर आमच्या मनात;

बापाचे स्वप्न पूर्ण करण्या,
गेला होता अविष्कार डॉक्टर बनण्या;

लागली कुणाची नजर,
आज दगडालाही फुटली पाझर;

गेला तरुण वयात सोडून,
केलेले सारे वादे तोडून;

तुझी आई आजही वाट पाही,
तिला तुझ्या डॉक्टर बनण्याची घाई;

कसे समझवू तिला,
तू परत येणार नाहीस मुला;

कुठे हरवलास पाखरा,
परत ये रे आमच्या लेकरा;

गेलास अविष्कार आम्हाला सोडून,
तुझ्यासाठी रंगविलेले सारे स्वप्न मोडून

आज आहे मातम सगळीकडे,
आई बाबा संगे सारा गाव ही रडे.

चि. अविष्कार यास अश्रूपूर्ण श्रद्धांजली

नेमकं काय झालं होतं ?

सर्वजण मित्राचा वाढदिवस साजकरा करण्यासाठी गेले होते. परतत असताना वर्धा-देवळी मार्गावरील सेलसुरा येथे पुलावरून त्यांची झायलो गाडी ४० फूट खाली कोसळून हा भीषण अपघात झाला.

एका ट्रक चालकाने सावंगी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पहाटे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पाटील, गावकरी यांच्या मदतीने जेसीबीने अपघातग्रस्त वाहन बाहेर काढण्यात आलं. भरधाव वेगात असलेली झायलो गाडी दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मृत नितेश सिंग याच्या मालकीची ही गाडी होती.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला. पालकमंत्री सुनील केदार यांनी ही घटना मनाला चटका लावणारी असून, वैद्यकीय शिक्षण घेणारे हे विद्यार्थी देशाचे भविष्य असल्याने मन खिन्न झाले आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. खासदार रामदास तडस यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली. आमदार डॉ. पंकज भोयर यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla vijay rahangdale post after son died in accident in wardha sgy

ताज्या बातम्या