गोंदिया : भाजपच्या मोहित कंबोज यांनी गोंदियाचे पालकमंत्री व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची बेनामी संपत्ती उघड करणार असल्याचा आरोप शनिवारी केला होता. त्यावर  मलिक यांनी कंबोज यांना प्रत्युत्तर दिले आहे.  मी भंगारवाला आहे. चोर नाही.  बँक बुडवून मी कोट्यवधी खाल्ले नाही.  माझ्या कुटुंबीयांची संपत्ती कुठे कुठे ते तुम्ही शोधाच,मी घाबरत नाही, अशा शब्दात त्यांनी  प्रत्युत्तर  दिले.   गोंदिया येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मलिक म्हणाले, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी कोणाकोणाचे संबंध होते व हॉटेलचे कोण मालक आहेत, हे तपासा. मग हॉटेलमधून ड्रग्ज क्रुझवर कसे गेले ते माहीत पडेल. आम्ही आता नाव घ्यायला सुरुवात केली आहे, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.   एनसीबीने कारवाईची जी छायाचित्रे समोर आणली ती घटनास्थळावरील नसून एनसीबी कार्यालयातील आहेत. समीर वानखेडे खोटया  कारवाया करत होते. एनसीबीने स्वत:ची प्रायव्हेट आर्मी तयार केली होती व निष्पाप लोकांना यामध्ये फसविले जात होते. समीर वानखेडे यांच्यासोबत कासिफ खान हासुद्धा या कटात सहभागी होता. त्यामुळे येणाऱ्या काळात कासिफ खान याच्याविरुद्ध पुरावे सुद्धा देणार आहोत, असेही मलिक यांनी सांगितले.