सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील नाराजी नाट्यातून ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या घराण्याने भाजपमधून बाहेर पडत थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून धैर्यशील मोहिते-पाटील हे भाजपच्या विरोधात तगडे आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर मोहिते-पाटील यांनी हाती घेतलेले बेरजेचे राजकारण पाहता जागे झालेल्या भाजपने आता माढ्यात नुकसान नियंत्रण करण्यासाठी हातपाय हलवायला सुरूवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून पूर्वाश्रमीचे भाजपचे आणि आता मोहिते-पाटील यांना मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी सरसावलेले उत्तम जानकर यांना विशेष विमान पाठवून मुंबईत पाचिरण केले आहे.

जानकर यांची मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांना थेट नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घालून दिली जाणार असल्याचे जानकर यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. उत्तम जानकर हे तसे पाहता मोहिते-पाटील यांचे पारंपारिक विरोधक असून गेल्या १५ वर्षात माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी मोहिते-पाटील गटाला झुंजविले होते. परंतु आता हेच जानकर भाजपवर नाराज असून त्यांनी भाजपवर फसवणुकीचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी मोहितै-पाटील यांच्याशी समझोत्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे. जानकर यांनी माळशिरस राखीव विधानसभा तर मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा लढवावी आणि एकमेकांना मदत करण्याच्या अटीवर दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. येत्या चार दिवसांत यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा…“निवडणुका असल्या तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” मुख्यमंत्र्यांची ग्वाही; म्हणाले..,

माळशिरसमध्ये जानकर यांना मानणारे सुमारे ६० ते ७० हजार मतदार असल्याचे यापूर्वी लढविलेल्या विधानसभा लढतींतून दिसून येते. जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांना साथ दिल्यास भाजपचे मोठे नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर अखेर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जागे होत उत्तम जानकर यांना मोहिते-पाटील यांच्या सोबत जाण्यासाठी रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून फडणवीस यांनी जानकर यांना मुंबईत सागर बंगल्यावर भेटीसाठी पाचारण केले आहे. त्यासाठी विशेष विमान पाठविण्यात येत आहे. हे विशेष विमान बारामती येथून मुंबईला जानकर यांना घेऊन जाणार आहे.

हेही वाचा…‘माझे काका अभिनय क्षेत्रात नव्हते’, नटसम्राट या टीकेवर अमोल कोल्हेंची अजित पवारांवर खोचक टीका

नंतर लगेचच जानकर यांना नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी नेण्यात येणार आहे. या हालचालींना जानकर यांच्या निकटवर्तीयांनी दुजोरा दिला आहे. या भेटीतून जानकर यांना भाजपकडून विधान परिषदेचे सदस्य देण्याबरोबरच त्यांच्या अन्य अडचणी सोडवून ‘अर्थ’पूर्ण समाधान केले जाऊ शकते, अशी माढ्यातील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.