गेल्या दोन दिवसांपासून लोकप्रियतेवरून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीत कुरघोडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत, अशी जाहिरात कथित शिंदे गटाकडून दिली होती. "राष्ट्रामध्ये मोदी अन् महाराष्ट्रामध्ये शिंदे" असा मजकूरही या जाहिरातीत छापला होता. या जाहिरातीवरून शिंदे गट व भाजपामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती होत नाही. ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही, अशा शब्दांत अनिल बोंडेनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं. ते वाशिम येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. हेही वाचा- जाहिरातींमधून फडणवीसांची कोंडी कोण करतंय? अजित पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले, “कोंबडा कितीही…” शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवर प्रतिक्रिया देताना अनिल बोंडे म्हणाले, "खरं म्हणजे आपल्या विदर्भात एक म्हण आहे. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती बनत नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टीसह सर्व जनतेनं त्यांना स्वीकारलं आहे. पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत असतील, असं मला वाटतंय. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाहीये. उद्धव ठाकरेंना वाटत होतं की, मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. आता एकनाथ शिंदेंना वाटायला लागलं की, ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. पुढच्या काळात शिवसेनेला (शिंदे गट) वाटचाल करायची असेल तर भारतीय जनता पार्टीचं आणि जनतेचं मन दुखावून किंवा स्वत:ची टिमकी वाजवून कल्याण होणार नाही." हेही वाचा- “शिंदे गटाकडून चूक झाली तर…”, ‘त्या’ जाहिरातबाजीवर बावनकुळेंचं थेट विधान विशेष म्हणजे "राष्ट्रामध्ये मोदी अन् महाराष्ट्रामध्ये शिंदे" ही जाहिरात मंगळवारी छापून आल्यानंतर शिंदे गटाने बुधवारी (१४ जून) नवीन जाहिरात प्रसिद्ध करत डॅमेज कन्ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. नवीन जाहिरातीत शिंदे गटाने देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो लावले आहेत. तसेच जाहिरातीतील मजकूराचा सूर युतीला समर्थन देणारा आहे.