Ashok Chavan On Congress : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं ९ डिसेंबरला अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आवाज विरोधकांनी विधानसभेतही उठवला होता. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केलं. या घटनेची आता तीन यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. मात्र, खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचाही सहभाग या प्रकरणात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तसेच वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप होत आहे. यावरून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. मात्र, या प्रकरणावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं चांगलंच राजकारण तापलं आहे.

असं असतानाच भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी राजीनाम्याच्या संदर्भात एक मोठं विधान केलं आहे. आरोप झाल्यानंतर लगेच राजीनामा घेणं ही पद्धत चुकीची असल्याचं मत अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे. आरोप झाल्यानंतर लगेच राजीनामे घेण्याची काँग्रेसची पद्धत चुकीची आहे. तेव्हा राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम झाला, असं विधान अशोक चव्हाण यांनी केलं आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेसचं सरकार असताना मुख्यमंत्री आणि मंत्र्‍यांवर आरोप झाले होते, तेव्हा राजीनामे घेतले गेले होते, त्यामध्ये अशोक चव्हाण देखील होते. त्या अनुषंगाने बोलताना आता अशोक चव्हाण मोठं भाष्य केलं आहे.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

“असं आहे की आरोप झाले की लगेच राजीनामा घेण्याची काँग्रेसमध्ये असलेली पद्धत चुकीची आहे, असं माझं मत तेव्हाही होतं आणि आजही आहे. त्यावेळी राजीनामे घेतले गेले. मग कोणत्या आधारावर राजीनामे घेतले गेले? विनाकारण कोणत्याही व्यक्तीला बदनाम करून राजीनामा घेणं चुकीचं आहे. दोषी असेल तर कारवाई करा. पण आरोप कोणीही करायचे. मी स्वत: या गोष्टीतून गेलेलो आहे. मी कोणत्याही प्रकरणाबाबत हा विषय बोलत नाही. बीडच्या प्रकरणाच्या संदर्भानेही मी हे बोलत नाही. मी हे जनरल बोलत आहे”, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

“राजकारणापोटी कोणाला बदनाम करण्यासाठी राजीनामा घेण्याचं सत्र काँग्रेसच्या काळात होतं, ते फार चुकीचं आहे. आरोप होतात, प्रत्यारोप होतात हा राजकारणाचा भाग आहे. यात माझी काही तक्रार नाही. मात्र, केवळ आरोपाच्या आधारावर काँग्रेसच्या काळात राजीनामा घेतला गेला हे निश्चित चुकीचं आहे. राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा कार्यक्रम तेव्हा झाला आहे”, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Story img Loader