मुंबई : राज्यातील सात कारखान्यांनी मे महिनाअखेर शेतकऱ्यांचे २३,२७९.५४ लाख रुपयांचे देणे थकविले आहे. या सात कारखान्यांना साखर आयुक्तालयाने अवसायानाची (आरआसरी) नोटीस बजावली आहे. सर्वाधिक तीन कारखाने सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

सात कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील तीन कारखान्यांचा समावेश आहे. १३०४६.२५ लाख रुपये गोकुळ शुगर्स लि., धोत्री. ३०२२.२६ लाख रुपये भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी, सिकंदर, १५९७.५६ लाख रुपये श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना लि., माढा. धाराशिव जिल्ह्यातील भिमाशंकर शुगर मिल्स लि., पारगाव यांच्याकडे १२२६.५१ लाख रुपये, अहिल्यानगरमधील केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लि. अहिल्यानगर यांच्याकडे २२४४.६५ लाख रुपये, नाशिकमधील एस. जे. शुगर डिस्टलरी अॅण्ड पॉवर प्रा. लि., नाशिक यांच्याकडे १९३.०४ लाख रुपये आणि छत्रपती संभाजीनगरमधील सचिन घायाळ शुगर्स प्रा. लि., पैठण या कारखान्यांकडे १९४९.२७ लाख रुपये, असे सात कारखान्यांकडे एकूण २३२७९.५४ लाख रुपयांची एफआरपी थकीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

भाजप खासदार धनंजय महाडिक यांना धक्का

भाजप खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा विश्वराज महाडिक अध्यक्ष असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या एफआरपीचे ३०२२२.२६ लाख रुपये थकीत असून, साखर आयुक्तांनी आरआरसीची नोटीस बजावली आहे. कारखाना गेली अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. २०२५ मध्येही कारखान्याला नोटीस बजावण्यात आली होती.

यंदाच्या हंगामातील ६७७ कोटी रुपयांची एफआरपी थकीत

राज्यातील गळीत हंगामात यंदा २१० कारखान्यांनी  १०४५.६३ लाख उसाचे गाळप केले. या कारखान्यांकडे एकूण ४०,४४६ कोटी रुपयांची एफआरपी देय होती. त्यापैकी ३९७६९ कोटी रुपयांची एफआरपी देण्यात आली आहे, तर ६७७ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. २१० कारखान्यांपैकी १३९ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली आहे. ८० ते ९९.९९ टक्के एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या ६२ आहे. ६० ते ७९.९९ टक्के एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या तीन असून ००.०० ते ५९.९९ टक्के एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या सहा आहे. एकूण ७१ कारखान्यांकडे ६७७ कोटींची एफआरपी थकीत आहे.