शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्ष कुणाचा, पक्षचिन्ह कुणाचं इथपासून तर बंडखोर कोण आणि अपात्र कोण होणार हे मुद्दे सर्वोच्च न्यायालयात गेले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगितले. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून यावर निर्णय घेण्यास दिरंगाई होत असल्याचा आरोप करत विरोधकांकडून सडकून टीका होत आहे. यावर भाजपा खासदार प्रताप चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (२७ सप्टेंबर) नांदेडमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत होते.
खासदार प्रताप चिखलीकर म्हणाले, “विधानसभा आणि लोकसभा फार वेगळी आहे. लोकसभेच्या अध्यक्षांचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. विधानसभेच्या अध्यक्षांचाही सर्वांनी सन्मान केला पाहिजे. जेव्हा विधान सभा अध्यक्षांकडे एखादी याचिका सुनावणीसाठी दाखल होते, तेव्हा विधान सभा अध्यक्ष न्यायमूर्तींच्या भूमिकेत असतात.”
“म्हणून आपण एखाद्या न्यायमूर्तींबद्दल बोलण मला अतिशय चुकीचं वाटतं. त्यामुळे अंबादास दानवेंनी वायफळ बडबड करू नये, एवढंच मला सांगायचं आहे,” असं मत प्रताप चिखलीकर यांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
मी सहनशील कन्या या पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं
मी सहनशील कन्या, या पंकजा मुंडेंच्या वक्तव्याविषयी विचारणा केली असता प्रताप चिखलीकरांनी उत्तर देणं टाळलं. तसेच मी माहिती घेऊन बोलेन, असं म्हटलं.
“संपूर्ण भारतात महिला भगिनींकडून मोदींचा सन्मान”
महिलांना मिळालेल्या आरक्षणावर बोलताना प्रताप चिखलीकर म्हणाले, “मीच नाही तर संपूर्ण भारतात महिला भगिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान करत आहेत. ५० वर्षांपासून चर्चेत असलेलं, २०-३० वर्षांपासून होऊ घातलेलं महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे देशात अतिशय उत्साह आहे.”
हेही वाचा : VIDEO: “नार्वेकरांना कुणी काय मार्गदर्शन केलं याची…”, अंबादास दानवेंचा हल्लाबोल, म्हणाले…
“दिल्लीच्या १०० महिलांकडून प्रत्येक खासदाराची आरती करून सन्मान”
“हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सभागृहात जाताना दिल्लीच्या १०० महिलांनी माझ्यासह प्रत्येक खासदाराची आरती ओवाळून सन्मान केला. या निमित्ताने महिला पुढे येतील आणि त्याही नेतृत्व करू शकतील हे त्यातून सिद्ध होईल,” असंही चिखलीकरांनी नमूद केलं.