बीड : खासदारच नव्हे तर एक महिला म्हणून त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. त्यांनी केलेल्या आरोपावर वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. कुस्तीगीर महिला खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता, अशी स्पष्ट भूमिका घेत सरकारकडून कुस्तीगीरांशी संवाद साधायला कोणीच गेले नसल्याची खंत भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बुधवारी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीड येथील भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कार्यालयात बुधवार, ३१ मे रोजी खासदार प्रीतम मुंडे यांनी पत्रकार बैठकीत भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाची माहिती दिली. खासदार मुंडे म्हणाल्या, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर महाजनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या माध्यमातून केंद्राच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या. करोना काळात सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेत जागतिक स्तरावर दखल घ्यावे असे काम केले. उज्ज्वला, मुद्रा अशा योजना प्रभावीपणे राबवल्या. पंतप्रधान ग्रामसडक योजना, राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जिल्ह्यातील रस्ते चकाचक झाले आहेत. त्यामुळे रोजगार निर्मिती देखील होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजनेतून ग्रामीण भागात २० हजारांवर घरे उभारली गेली. विकास कामांबरोबरच ३७० कलम रद्द करणे, तिहेरी तलाक रद्दचा निर्णय स्वागताहार्य होता, असेही खासदार मुंडे म्हणाल्या.

बीड जिल्ह्यातील रेल्वेचे काम पूर्ण होऊन २०२४ पर्यंत रेल्वे येईल असे आपण कधीही सांगितले नव्हते. रेल्वे कामाला अधिक गती मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरुच आहे. मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारने या रेल्वे प्रकल्पाचा राज्य हिस्सा देताना हात आखडता घेतल्याने कामावर परिणाम झाला होता. मात्र सत्तातरानंतर राज्य हिश्याचा २०० कोटींचा निधी रेल्वे विभागाकडे वर्ग केल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या खासदारकीच्या काळाची तुलना केल्यास ४० वर्षांत मिळाला नाही तेवढा निधी या काळात मिळाल्याने नऊ वर्षांत गतीने काम होऊ शकले. ही बाब माझ्यासाठी समाधानाची आहे. परळीकडून काम सुरू आहे. रेल्वे रुळाच्या जागेची मालकी ही महावितरणकडे की राज्य सरकारकडे यावरुन संभ्रम निर्माण झाला आहे. तो प्रश्‍न मार्गी लागल्यास रेल्वेचे काम गतीने सुरू होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होत असताना महिला कुस्तीगीरांनी खासदार बृजभुषण पांडे यांच्याविरोधात कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन केले. या विषयी विचारले असता खासदार मुंडे यांनी एक महिला म्हणून निश्‍चितच या गोष्टीचा खेद वाटतो. त्या महिला कुस्तीगीरांचे म्हणणे कोणीतरी ऐकून घ्यायला हवे होते, त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार प्रीतम मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, प्रवक्ते राम कुलकर्णी, प्रा.देवीदास नागरगोजे यांची उपस्थिती होती.

…अर्धी निवडणूक जिंकली -खासदार प्रीतम मुंडे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरलेला नाही. माझ्यासमोर चांगला उमेदवार असेल तर निवडणूक लढवताना कर्तृत्व सिद्ध करता येऊ शकेल, चांगली लढत होईल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारच ठरत नसल्याने अर्धी निवडणूक मी जिंकली असा दावा खासदार प्रीतम मुंडे यांनी केला.

पालकमंत्री असताना काय केले?

बीड जिल्ह्याच्या खासदारांनी नऊ वर्षात एकही भरीव कामगिरी केली नसल्याचा आरोप आमदार धनंजय मुंडे यांनी केला होता. याविषयी पत्रकारांनी विचारले असता खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, दळणवळणाच्या बाबतीत जिल्ह्याचे दुर्दैव आहे. दळणवळणाची साधने असल्यास औद्योगिक क्षेत्र, कारखाने वाढतात. उद्योजकांना उद्योगासाठी बोलावयाचे आणि त्यांनी लगेच यायचे हे एवढे सोपे नाही. प्रत्येक गोष्टीचा विचार करुनच त्यांना निर्णय घ्यावे लागतात. माझ्यावर टीका करणार्‍यांचे गल्ली ते दिल्ली सरकार होते. राज्यात तीन वर्षांपूर्वीही त्यांचेच सरकार होते. मात्र, त्यांना एकही चांगला उपक्रम राबवता आला नाही. पालकमंत्री असताना त्यांनी तरी काय उल्लेखनीय कामगिरी केली, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना नाव न घेता लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mp pritam munde regrets about women wrestlers beed amy
First published on: 31-05-2023 at 20:32 IST