सातारा जिल्हा बँक निवडणूक

वाई : जरंडेश्वार कारखान्याला कर्ज पुरवठा केल्याबद्दल सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आली होती. आता यातून सक्तवसुली संचालनालय या कर्जाची संचालकांकडून वसुली करण्याची शक्यता आहे. जे संचालक याला जबाबदार आहेत, त्यांच्याकडूनच वसुली व्हावी, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी येथे बोलताना व्यक्त केले.

सातारा जिल्हा बँक निवडणुकीमुळे सध्या जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी आज बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांची भेट घेतली. जरंडेश्वार शुगर मिल कर्ज प्रकरणाची माहिती मागितली. यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, की ‘जरंडेश्वार शुगर मिल’ला कर्ज पुरवठा केल्याबद्दल सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आली होती.

आता यातून सक्तवसुली संचालनालय या कर्जाची संचालकांकडून वसुली करण्याची शक्यता आहे. जे संचालक याला जबाबदार आहेत, त्यांच्याकडूनच वसुली व्हावी. ज्यावेळी जरंडेश्वार कारखान्याला यांनी कर्ज दिले त्यावेळपासून मी आवाज उठवत आहे. यावेळी त्यांनी अजित पवार आणि शिवेंद्रसिंहराजेंचा उल्लेख टाळून टीका केली.

बँकेत जागा अडवणाऱ्यांना संधी नाही या टीकेला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, की बँकेत कोणी जागा अडवली हे त्यांना माहिती आहे. बँकेची चौकशी लागली तरी त्यांना याबाबत माहिती दिसत नाही. आत्ता निवडणूक लागलेली असल्यामुळे बँकेत त्यांचे येणे जाणे सुरू झाले असल्याची टीका त्यांनी शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता केली.