भाजपासहित सर्वांची यादी देतो म्हणणाऱ्या उदयनराजेंचं पुन्हा ईडीला आव्हान, म्हणाले, “कारवाई करणार असाल तर…”

ईडीने कारवाई करताना ती माध्यमांसमोरच झाली पाहिजे असं उदयनराजे म्हणाले आहेत

BJP, Udayanraje Bhosale, ED, Enforcement Directorate, उदयनराजे, उदयनराजे ईडी
ईडीने कारवाई करताना ती माध्यमांसमोरच झाली पाहिजे असं उदयनराजे म्हणाले आहेत (File Photo: Express)

राज्यात सध्या ईडीच्या कारवायांवरुन राजकारण रंगलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडीकडून चौकशी केली जात आहे. भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याची तक्रार सत्ताधाऱ्यांकडून केला जात असताना भाजपाकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे. दरम्यान भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा ईडीला आव्हान दिलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, भाजपासहित सर्वांची…”, उदयनराजे संतापले

“ईडीने यावं पण कारवाई करणार असाल तरच या अन्यथा येऊ नका. नाहीतर परत यांचा, त्यांचा फोन आला म्हणून सांगतील. तसं असेल तर येऊ नका, येणार असाल तर सर्व प्रसारमाध्यमांसोर या आणि सांगा. नाहीतर उद्या उगाच राजकारण झालं, द्वेषापोटी अशी आरडाओरड होऊ नये,” असं आव्हानच उदयनराजेंनी दिलं आहे. यावेळी त्यांनी ईडीने कारवाई करताना ती माध्यमांसमोरच झाली पाहिजे असं म्हटलं आहे.

याआधी काय म्हणाले होते –

उदयनराजे भोसले यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना भाजपालाही घरचा आहेर दिला होता. एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं अशा शब्दांत त्यांनी भाजपासहित इतर पक्षांवरही टीका केली होती. ईडी आपल्याकडे आली तर सर्वांचीच यादी देतो असंही ते यावेळी म्हणाले होते.

“मी चालत फिरेन, रांगत फिरेन, हवं तर लोळत फिरेन,” शिवेंद्रराजेंच्या ‘त्या’ टीकेला उदयनराजेंनी दिलं प्रत्युत्तर

“जसं आपण पेरतो तसं उगवतो. आमच्या मागे ईडी नाही…ज्यांनी वाईट केलं आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,” असं उदयनराजे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना ईडीच्या कारवाईमागे भाजपाचं षडयंत्र असल्याच्या आरोपाविषयी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांच झाकायचं आणि सोयीप्रमाणे एकमेकांचं काढतात. बास झालं आता राजकारण”.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp mp udayanraje bhosale challenge ed satara sgy

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या