राज्यात सध्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांविरोधात ईडीची कारवाई सुरु आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकांच्याही पूर्वीपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातल्या काही नेत्यांचा तपास सुरू केला आहे. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांची चौकशी सध्या ईडी, आयकर विभाग किंवा सीबीआय करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून राजकारणासाठी वापर होत असल्याची तक्रार विरोधकांकडून केली जात असताना भाजपाकडून मात्र हा आरोप सातत्याने फेटाळून लावला जात आहे. दरम्यान भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी आता यावर भाष्य केलं असून ईडीने हिंमत असेल तर आपल्याकडे यावं असं म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“मी चालत फिरेन, रांगत फिरेन, हवं तर लोळत फिरेन,” शिवेंद्रराजेंच्या ‘त्या’ टीकेला उदयनराजेंनी दिलं प्रत्युत्तर

उदयनराजे भोसले यांनी ईडीच्या कारवाईवर भाष्य करताना भाजपालाही घरचा आहेर दिला आहे. एकमेकांचं झाकायचं आणि सोयीप्रमाणे काढायचं अशा शब्दांत त्यांनी भाजपासहित इतर पक्षांवरही टीका केली. ईडी आपल्याकडे आली तर सर्वांचीच यादी देतो असंही ते यावेळी म्हणाले.

“जसं आपण पेरतो तसं उगवतो. आमच्या मागे ईडी नाही…ज्यांनी वाईट केलं आहे त्यांच्याच मागे का लागले आहेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं. पुराव्यासकट मी ईडीला यादी देईन,” असं उदयनराजे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांना ईडीच्या कारवाईमागे भाजपाचं षडयंत्र असल्याच्या आरोपाविषयी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “कोणीही असू दे मी सर्वांची यादी देतो. एकमेकांच झाकायचं आणि सोयीप्रमाणे एकमेकांचं काढतात. बास झालं आता राजकारण”.

भाजपामध्ये आलो, आता चौकशी वगैरे काही नाही, शांत झोप लागते – हर्षवर्धन पाटील

दरम्यान कधीकाळी काँग्रेसचे एक प्रमुख नेते असलेले हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांनी केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे. या विधानामुळे विरोधकांना आयतंच कोलीत मिळाल्याचं बोललं जात आहे. एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आपण भाजपामध्ये आल्यानंतर काय बदल घडला, याविषयी मिश्किल टिप्पणी केली. “इथे आमदार साहेब मला म्हणाले, मी आहे तिथे सुखी आहे, तम्ही दिल्या घरी सुखी राहा. मला विचारणा झाली की तुम्ही भाजपामध्ये का गेलात? त्यावर मी त्यांना म्हटलं ते तुमच्या नेत्यालाच विचारा की हर्षवर्धन पाटील भाजपामध्ये का गेले. पण मी सांगतो, इथे मस्त निवांत आहे. भाजपामध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय”, असं हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.