राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापासूनच सत्ताधारी आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. मग ती ‘खोके सरकार’ म्हणून केलेली टीका असो किंवा सत्ताधाऱ्यांनी ‘आदित्य ठाकरेंची ‘दिशा’ चुकली’ असं म्हणत लगावलेला खोचक टोला असो. अलिकडे वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्यावरून राजकारण पेटलं आहे. या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: एकनाथ शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे.

शनिवारी ( २४ सप्टेंबर ) आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी वेदांता, बल्क ड्रग पार्कनंतर मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरेंच्या या आरोपांना आता भाजपा खासदार उन्मेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“एमआयडीसीला रिअल इस्टेट कंपनी कोणी केली”

“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला विचारलं पाहिजे की, महाविकास आघाडी सरकार असताना पाच दिवसांच्या वर तुम्ही अधिवेशन घेतलं का? गुजरातने तीन वर्षापूर्वी आणलेली सेमीकंडक्टर पॉलिसी महाराष्ट्राने का आणली नाही. एमआयडीसीला युवकांचे रोजगार केंद्र समजलं जाते. त्याला रिअल इस्टेट कंपनी कोणी केली?,” असा सवाल पाटील यांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे.

“दूध का दूध पाणी का पाणी होऊद्या”

“एमआयीडीतील भूषण देसाई, गिरीष पवार यांनी केलेल्यी व्यवहारांची चौकशी करा. एमआयीडीसीमध्ये तीन हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय चौकशी करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करतो. दूध का दूध पाणी का पाणी होऊद्या,” असेही उन्मेश पाटील यांनी म्हटलं.