Ameet Satam on Raj Thackeray : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अनेकठिकाणी दुर्घटनाही घडत आहेत. झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे तर एका मॅनहोलमध्ये पडून एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. यानंतर आमदार अमित साटम यांनी विधानसभेत जयंत पाटलांशी बोलताना केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला. याची दखल थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता अमित साटम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हायरल होत असलेल्या आणि विविध वृत्तवाहिन्यांनी दाखवलेल्या व्हिडीओनुसार, आमदार अमित साटम हे विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार) जयंत पाटील यांच्याशी हास्यविनोद करताना दिसत आहेत. “काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं…”, असे बोलून ते हसतात.
राज ठाकरे काय म्हणाले?
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, असं म्हणत खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही, असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
अमित साटम यांचं प्रत्युत्तर काय?
“आशय बदलून विपर्यास करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत. घरात बसून पोस्ट लिहितात त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही”, असं म्हणत अमित साटम यांनी राज ठाकरेंवर टीका केली. ते पुढे म्हणाले, “आजपर्यंत अशाप्रकराच्या (मुंबईतील दुर्घटना)घटना घडल्यावर निलंबन झालं नव्हतं. मी विधानसभेत आवाज उचलला आणि पालिकेचे अधिकारी निलंबित झाले आहेत. त्यामुळे आम्ही फिल्डवर उभे आहोत. घरात बसून पोस्ट किंवा स्टेटमेंट लिहत नाहीत.”
“आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मुंबईकरांनी रस्त्यावर उतरलेलं पाहिलंय का? नाही ना? मुंबई शहराच्या महापौर रस्त्यावर फिरत आहेत. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी रस्त्यावर उभे राहून पाहणी करतोय.पण मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय”, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
