कोकण दौऱ्यात अधिकाऱ्यांवर व्यक्त केलेल्या संतापावर नारायण राणेंचं स्पष्टीकरण; म्हणाले…

कोकणात पूरपरिस्थितीची पाहणी करताना एका अधिकाऱ्याशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दलही आक्षेपार्ह भाषा वापरली होती

BJP, Narayan Rane, Konkan
कोकणात पूरपरिस्थितीची पाहणी करताना एका अधिकाऱ्याशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दलही आक्षेपार्ह भाषा वापरली होती (File Photo: PTI)

महापुराचा फटका बसल्यानंतर पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं होतं. दौऱ्यासाठी आलो असताना एकही सरकारी अधिकारी उपस्थित नसल्याने नारायण राणे यांना संताप व्यक्त केला होता. आधी फोनवरुन आणि नंतर समोरासमोर त्यांनी अधिकाऱ्याला याप्रकरणी जाब विचारला होता. दरम्यान नारायण राणे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

“थांब रे, मध्ये बोलू नको”, नारायण राणेंनी फटकारलेल्या ‘त्या’ घटनेवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“दौरे फिरण्यासाठी केलेले नाहीत. त्यांनीही करु नयेत. आम्ही पूरस्थिती पाहण्यासाठी गेलो होतो. लोकांचं नुकसान झालं आहे. त्याची माहिती अधिकाऱ्यांना विचारणं, दाखवणं आमचं काम आहे. कारण शेवटी अंमलबजावणी करण्याचं काम अधिकारी करतात. त्यामुळे जिथे लोकप्रतिनिधी जातात तिथे अधिकाऱ्यांनी आलंच पाहिजे असा नियम आहे. म्हणून अधिकाऱ्याला तिथे बोलावलं होतं, पत्र पाठवून सांगितलं होतं. अधिकारी उपस्थित राहिले नाहीत म्हणून नाराजी जाहीर केली,” असं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलं आहे.

चिपळूण दौऱ्यात अधिकाऱ्यांना झापणाऱ्या नारायण राणेंवर अजित पवारांची नाव न घेता टीका; म्हणाले…

नारायण राणेंवर अजित पवारांची नाराजी

“जेव्हा एखाद्या ठिकाणी जाता तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी, इतर काम करणारी टीम मुख्यमंत्र्यांकडेच गेली पाहिजे. कोणीही मुख्यमत्री असलं तरी असंच होणार. अशा संकटाच्या काळात पक्षीय वाद, मतभेद मधे आणायचे नसतात. आम्हीदेखील पाच वर्ष सरकारमध्ये नव्हतो. त्यावेळीही संकंट आली की जायचो. आम्ही कधीही जिल्हाधिकारी, प्रांतिधिकारी कुठे आहेत अशी विचारणा केली नाही,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंचं नाव न घेतला गुरुवारी नाराजी जाहीर केली.

“अरे तुम्ही त्यांना पहायला आला आहात की पाहणी करण्यासाठी आला आहात. तुम्हाला सांगायचं असेल तर पाहणी केल्यावरही सांगू शकता,” असंही यावेळी ते म्हणाले.

नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

“वेगवेगळ्या व्यक्तींना पाहणी करण्याचा अधिकार आहे. त्यांच्यासोबत आम्ही नोडल अधिकारी नेमले असून ते माहिती देतील. व्हीआयपी गेले तर त्यांच्या मागे सगळे फिरत राहतात आणि कामावर परिणाम होतो,” असं अजित पवारांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांबद्दलची राणेंची भाषा असंस्कृत

कोकणात पूरपरिस्थितीची पाहणी करताना एका अधिकाऱ्याशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली होती. वृत्तवाहिन्यांवरून ते संभाषण लोकांपर्यंत पोहोचले. त्याबाबत अजित पवार यांनी भाष्य केले. “यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. त्यानंतर जी परंपरा महाराष्ट्राला लाभली तेव्हापासून मोठमोठे लोक राज्याचे प्रमुख झाले. त्यामध्ये वसंतदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख यांचा काळ आठवला तर कधीही अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांबद्दल अनुद्गार त्या काळातील विरोधी पक्षांच्या लोकांनी किंवा विरोधी पक्षनेत्यांनी काढले नव्हते,” असंही पवार यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp narayan rane clarification over his anger on government officers in konkan flood visit sgy